दिनमान प्रतिनिधी
ठाणे। शहरातील रस्ते, दुभाजक आणि चौकात अनधिकृतपणे जाहिरातींची फलकबाजी, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भित्तीपत्रके लावून शहर विद्रूप करणार्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा-1995 अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करा, असे सक्त आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.
ठाणे महापालिकेतर्फे शहरात सुशोभीकरणांतंर्गत विविध थीम्सद्वारे रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत. याद्वारे संपूर्ण शहर सुशोभित होत आहे. परंतु काही व्यक्तींकडून चौकाचौकात होर्डिंग्ज, अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतींवर पत्रके लावून शहर विद्रूप केले जात आहे.
शहरातील प्रमुख चौक, भिंती, रस्ते दुभाजक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक, वैद्यकीय, मेस, नोकरीविषयक, हॉटेल्स जाहिराती तसेच भाड्याने फ्लॅट देणारे दलाल यांच्यामार्फत स्टिकर, पत्रके, भित्तिपत्रके लावण्यात येत आहेत. शहर विद्रूप करणार्या या सर्व व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन संबंधित व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त शर्मा यांनी दिले आहेत.
आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा!
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी सकाळी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, गटर्स कामांची पाहणी करून शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे, पार्किंग गाड्या तात्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले.