डॉ. भास्कर धाटावकर | इतिहासात डोकावताना
मुंबई पुराभिलेखागाराची निर्मिती सन १८२१ साली झाली. विल्यम क्राप्ट हा पहिला रेकॉर्डकीपर होता व अभिलेख एल्फिन्स्टन सर्कलमधील सेक्रेटरीच्या तळमजल्यावरील जागेत होते. रेकॉर्ड दिवसेंदिवस वाढत होते म्हणून ते नव्याने बांधलेल्या टाऊन हॉलच्या तळमजल्यावर दाटीवाटीने ठेवण्यात आले. १८७४ मध्ये नवीन सचिवालय सध्याच्या सीटी सिव्हिल कोर्टाच्या ठिकाणी बांधण्यात आल्यावर सचिवालयाच्या जवळच अभिलेख असावेत या संकेतानुसार ते सचिवालयातील मेडिकल स्टोअरच्या जागेत दाटीवाटीने ठेवण्यात आले. अभिलेखांसाठी एक स्वतंत्र सुसज्ज इमारत असावी, ही सूचना पुढे आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी इमारत बांधण्याची परवानगी दिल्यानंतर सध्याची एल्फिन्स्टन कॉलेजची इमारत खास अभिलेखांसाठीच निर्माण करण्यात आली. तसा शिलालेख मुख्य प्रवेशद्वारावर आहे. पण काही दिवसांतच चिंचपोकळीला असलेले एल्फिन्स्टन कॉलेज पहिल्या मजल्यावरील एक बाजू व दुसर्या मजल्यावरील दोन्ही बाजू देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकामविभाग आदेश क्रमांक ५२० / ? सीडब्ल्यू २२२५ दि. २१ डिसेंबर १८८९ च्या अन्वये याची कोणास किती जागा देण्यात आली, हे स्पष्ट करण्यात आले आहे.एल्फिन्स्टन कॉलेजची इमारत मुंबई इलाख्याचे वास्तुविशारद खान बहादूर मच्चरजी मर्झबान यांनी तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे बांधण्यात आली आणि तिचे उद्घाटन दिनांक ४ फे ब्रुवारी १८८९ रोजी तत्कालीन गव्हर्नर डोनाल्ड जेम्स लॉड्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. ही इमारत गॉथिक वास्तुशिल्प पद्धतीचीे असून चौकोनी भूभागाच्या तीनही बाजूंवर बांधण्यात आली आहे. इमारतीच्या दर्शनी भागात उत्तर- दक्षिण बाजूस त्रिकोणाकृती घुमट असून त्याच्या चारी बाजूस चार टोकदार दगडी मिनार आहेत. या पुराभिलेख विभागासाठी स्वतंत्र सुसज्ज आधुनिक इमारत असावी, म्हणून तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय अशोक चव्हाण यांनी मंजुरी देऊन इमारतीचा प्लान मंजूर केला. गव्हर्नमेंट वसाहती बांद्रा पूर्वेकडील भूखंडावर पुराभिलेख विभागाचे ७/१२ वर नावही लागले. बजेटमध्ये दोन कोटींची तरतूद करण्यात आली. पण दुर्दैवाने सरकार बदलले आणि या इमारतीचा प्रश्न थंडावला. मीसुद्धा २०११ मध्ये निवृत्त झालो. इमारत न झाल्याची खंत कायम राहीली आहे. ही इमारत नेमकी कोणासाठी बांधण्यात आली, यावर एल्फिन्स्टन कॉलेज आणि पुराभिलेख विभाग यांच्यात वादविवाद निर्माण झाल्यावर आमच्या मदतीला हे ऐतिहासिक दस्तऐवज धावून आले. यावरून अभिलेखांचे महत्त्व द्विगुणित होत आहे.
अभिलेख हे निर्भीड असतात आणि सत्य तेच सांगत असतात.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत! त्यांच्या नामोच्चारानेच मराठी मनं, मनगटांना चेतना मिळते. ऊर्जा मिळत असते. शिवप्रभूंची कीर्ती सातासमुद्रापार १६७२ मध्ये गेली होती. लंडन टाइम्स या तत्कालीन वृत्तपत्रातून महाराजांचे गुणगान पहिल्या पृष्ठावर छापण्यात आले होते. हे वृत्तपत्र आजही लंडनमधील अभिलेखागारात जतन करून ठेवण्यात आले आहे.शिवछत्रपतींच्या हस्ताक्षरातील अस्सल पत्रांचे एक प्रकाशन प्रसिद्ध करण्याचा आदेश माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी १ मे १९८७ रोजी ऐतिहासिक अभिलेख व छायाचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला दिला होता. त्याप्रमाणे १६४६ ते १६७९ पर्यंतची जी फक्त १३ पत्रे महाराष्ट्रातील निरनिराळ्या अभिलेखागारांत उपलब्ध होती ती एकत्रित करून शिवछत्रपतींच्या पत्रांचे प्रतिरूप दर्शन या मी संपादक असलेल्या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे यथार्थ दर्शन होते. या सर्वच पत्रांमध्ये त्यांच्या संस्कृतप्रचूर अष्टकोनी राजमुद्रांचा समावेश आहे. यातील एकेक पत्र म्हणजे स्वतंत्र शोधनिबंधाचा विषय आहे. यातील एक पत्र १६७८ सालातील असून सरदार पाटणकर युद्धात धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराजांनी रायगडावरून पाठविला आहे. त्यांची विचारपूस करून कुटुंबातील सर्वांना आश्वासित करून भविष्यातील चिंता वाहणारे शिवराय वेगळ्याच उंचीवर गेल्याचे आपणास दिसून येते. ही सर्वच तेरा पत्रे शिवाजी महाराजांच्या निरनिराळ्या पैलूंचे विलोभनीय दर्शन घडवतात. असे ऐतिहासिक दस्तऐवज इतिहासाचे साक्षीदार आहेत.
क्रमशः
(लेखक हे महाराष्ट्र शासनामधील निवृत्त पुराभिलेख संचालक आहेत.)