दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर।
कल्याण- बदलापूर हा महामार्ग उल्हासनगरमार्गे जात असून या महामार्गावरील बेकायदा पार्किंगवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 25 दुचाकी व दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्या मालकांकडून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पोलिस व वाहतूक अधिकारी यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीत शहरात वाहतुकीस अडथळा ठरणार्या बेवारस वाहनांवर व बेकायदेशीर गाड्या उभ्या करणार्या वाहन विक्रेत्यांच्या पार्किंगवर कारवाई करण्याचा पवित्रा जाहीर केला होता.
मागच्या आठवड्यात पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांनी प्रभागनिहाय तब्बल दीडशे बेवारस वाहनांवर स्टिकर्स चिकटविली होती. मालकांनी आठवडाभरात त्यांची बेवारस वाहने उचलली नाहीत तर त्यांची जप्ती करण्यात येईल, असा इशारा चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्समधून देण्यात आला होता.
अजीज शेख यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, तुषार सोनवणे, अजित गोवारी, दत्तात्रय जाधव यांनी कल्याण- बदलापूर या महामार्गावरील दुचाकी चार चाकी दुकान विक्रेत्यांकडे मोर्चा वळवला. दुकानांसमोर असलेल्या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करून 25 दुचाकी व दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.