दिनमान प्रतिनिधी
विरार|
यंदा वसई विरार शहर महापालिकेने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सार्वजनिक तलावांत बंदी आणल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या या निर्णयाविरोधात पारंपरिक पद्धतीने विसर्जन करणार्या भाविकांत जास्त नाराजी दिसून येत होती. अखेरीस भाविकांच्या नाराजीचा व धार्मिक अस्मितेची कदर करीत एक पाऊल मागे येत पारंपरिक पद्धतीने तलावांत विसर्जन करणार्या भाविकांना सूट दिली आहे. त्यामुळे भाविकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यंदा महापालिकेने जलप्रदूषण होऊ नये, याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर यंदा वसई विरारमध्ये सुमारे १०५ कृत्रिम तलाव ठिकठिकाणी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
सार्वजनिक तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण यानिमित्ताने सदर तलावांत बाप्पांच्या मूर्ती विसर्जित करण्यात येऊ नयेत, यासाठी पालिकेने तलावांत विसर्जनावर बंदी आणली आहे. मात्र त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. ऐन विसर्जन काळात भाविक विरुद्ध महापालिका असा वाद उफाळून येण्याची चिन्हे असताना पालिकेने पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करणार्या भाविकांना या नियमातून शिथिलता दिली आहे.
सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती मोठ्या मूर्ती असणार्यांना तलावाऐवजी खदान, जेट्टी तसेच समद्रकिनारी सोय उपलब्ध ठेवण्यात आली आहे. मात्र गणेशमूर्ती मंडप ते विसर्जनस्थळ यात बरेच अंतर असल्याने सार्वजनिक मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी यंदा महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. हे कृत्रिम तलाव कोठे आहेत, हे भाविकांना माहिती पडण्यासाठी पालिकेने खास गुगल मॅप उपलब्धता करून दिला आहे. यावर्षी पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन व्हावे, यासाठी महापालिकेने कृत्रिम तलावांच्या बाहेरच मूर्ती संकलन केंद्र ठेवले आहे.