जालना । चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो, असेही टोपे म्हणाले. सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, ही समाधानाची बाब असली तरी लसीकरण करणे आवश्यक असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
देशात किंवा राज्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते का असा प्रश्न जालन्यामध्ये पत्रकारांनी राजेश टोपेंना विचारला. यावर उत्तर देताना राजेश टोपेंनी आधी रुग्णसंख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की नवीन केसेसची संख्या कमी झाली आहे. राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी 48 हजार रुग्ण आढळत होते. काही लाखांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचं प्रमाण खूप चांगले आहे, असेही टोपे म्हणाले.
बूस्टर डोससाठी जे पात्र आहेत त्या आरोग्य कर्मचार्यांनी, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिसांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. 15 ते 18 वयोगटातील लोकांनाही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिलाय. लसीकरण राहिलेल्यांना मी प्रार्थना करेल की ज्यांची पहिली लस राहिली आहे त्यांनी ती नक्की घ्यावी. जर आपल्याला चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित राहायचे असेल, समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं ही काळाची गरज आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले. जर आपल्या सर्वांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये फाइट आऊट करण्याची प्रतिबंधात्मक शक्ती असेल तर निश्चितच चौथ्या लाटेचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अजिबात धोका असणार नाही, असेही त्यांनी सांगितलं.