दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
ठाण्याला पश्चिमेला लागून भले मोठे असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले आहे. याच उद्यानात अनेक जंगली प्राणी पक्षी व आदिवासी बांधवांचा वावर असतो. मात्र हळूहळू जे जंगल नाहीसे होत चालले असल्याने स्थानिक आदिवासी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
येऊर येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, रात्रभर चालणारे क्रिकेट तर्फ, दारू व अंमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंगसह येऊर येथे नंगानाच हे सर्व प्रकार खुलेआम सुरू आहे. आदिवासीं बांधवांनी आता ‘येऊर जंगल वाचवा’ मोहीम सुरू केली आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी येऊर आदिवासी वनहक्क समितीने केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकमेव अस उद्यान आहे की त्याच्या बाजूने शहर आहेत. मुंबई आणि ठाणे ही मोठी शहरे आहेत, त्यामुळे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे या शहराची फुफ्फुसे आहे. या शहरांना प्राणवायू पुरवण्याचे काम हे राष्ट्रीय उद्यान करत आहे. हे उद्यान इतके महत्त्वाचे असताना सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. अलीकडच्या काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी लाटण्याचा प्रयत्न होत असून नियमांना व कायद्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे.
हॉटेल्स आणि बंगल्यांचा परिणाम येऊरच्या वन्यजीवांवर होत आहे. लहान वटवाघुळ, टिटवी, घुबड, मोठा घुबड, हुमन, गिधाड, काजवे, ससाणा हे पक्षी आता येऊर जंगलात आढळत नाहीत. वाढती बांधकामे, वाहतुकीचा आवाज, झाडे तोडणे आणि प्रकाश प्रदूषण यामुळे बिबट्या, तराश, काळी मांजर, हरिण, भेकर, बेडूकाचा वावरही कमी झाला असून ठाण्याच्या भूजलाचा मोठ्या प्रमाणावर र्हास झाला आहे.