दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई ।
स्वच्छ भारत अभियानात अनेक वर्षांपासून बक्षीस पटकावणार्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरकारी इमारतींच्या आवारातच अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे आगामी स्वच्छ भारत अभियानात शासकीय इमारतींच्या आवारात अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याची चर्चा घनकचरा विभागात सुरू आहे. स्वच्छता अभियानाचे वारे वाहू लागले असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात आम्ही कायमच स्वच्छता ठेवतो, असे घनकचरा विभाग छातीठोकपणे सांगत असतो. मात्र स्पर्धा निकाल जाहीर झाल्यावर स्वच्छ नवी मुंबईला काहीशी शिथिलता येते, हे उघड सत्य आहे. शहरात आजही त्यामानाने चांगली स्वच्छता निश्चित आढळून येते असे दिसून येत असले तरी सरकारी कार्यालय असणारे सिडको तसेच मनपाचेच विभाग कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य असते. यात खासकरून राडारोडा हमखास आढळतो. हा राडारोडा नूतनीकरण वा काही पडझड झाल्याने पडला असल्याचे सांगितले जात असले तरी तो तसाच पडून राहतो.