दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील चिमुकल्यांच्या इवल्याशा हातून घडलेल्या चित्रांच्या प्रदर्शन कलाविष्कारचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कृती व कलेचे माहेरघर असलेल्या डोंबिवली नगरीत चित्रकला क्लासेसच्या वतीने कलाविष्कार या चित्रप्रदर्शनाचे आयोजन १८ व १९ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व, रामनगर येथील आनंद बालभवन येथे करण्यात आलेे आहे. या प्रदर्शनात ७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींनी साकारलेल्या कलाकृतींचा आनंद सर्वांना लुटता येईल.
या मुलांच्या हातून काढलेल्या चित्रांचे वर्गीकरण केल्यास ती पेन्सिल, कलर पेन्सिल चित्रे, वॉटरकलर चित्रे, ३ डी, एलिमेंटरी आणि इंटरमीडियट ग्रेड परीक्षांची चित्रे आणि बरेच काही असे करता येईल. या प्रदर्शनाच्या उद्ाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे शताब्दी पुरस्काराने सन्मानित, उत्कृष्ट चित्रकार व मुख्याध्यापक श्रीधर केळकर आणि अनेक प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार तसेच अरुण कारेकर (रायगड जिल्हा), शिल्पकार सिद्धार्थ साठे (कल्याण), सुलेखनकार राम कस्तुरे (डोंबिवली) यांची उपस्थिती लाभणार आहे. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून व चित्रकार मुलांना प्रोत्साहन म्हणून जास्तीत जास्त कलाप्रेमींनी ह्या कलाविष्कार चित्रप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या वर्षीचा बालदिन साजरा करण्याची ही सुंदर कल्पना! तसेच कलेची आवड असणार्या मुलांना प्रोत्साहन मिळावे व अशा अनेक मुलामुलींनी आपल्या डोंबिवलीचे नाव विश्वस्तरावर न्यावे हाच उद्देश असल्याचे शिक्षिका श्रुती चौघुले यांनी सांगितले.
बावन चाळीत रविवारी किलबिल महोत्सव
डोंबिवलीतील बालदोस्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला मनोरंजन, मौजेचा किलबिल महोत्सव रविवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मागील ११ वर्षांपासून होणारा हा महोत्सव डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळीतील रेल्वे मैदानावर होणार आहे. संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम लहान मुलांसाठी मोफत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डोंबिवली परिसरातील पालक आपल्या मुलांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी होतात. चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर काढणे, चाकावर मातीच्या मडक्यांसह इतर भांडी तयार करणे, वायरपासून खेळणी तयार करणे, तांदळावर नाव कोरणे, आकर्षक मेंदी काढणे, लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे कार्यक्रम महोत्सवात आहेत. याशिवाय ड्रामा, जादूचे प्रयोग, जगलरचे प्रयोग पाहण्यास मिळणार आहेत.