राम जगताप | तर्काचा घोडा
शांताबाई शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922चा. म्हणजे कालच्या 12 ऑक्टोबरपासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. या वर्षभरात त्याच्याविषयी अनेक जण अनेक प्रकारे लिहितील. शांताबाईंसारख्या लोभस, प्रेमळ, रुजू आणि मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय, अनुभव आणि सहवास महाराष्ट्रातल्या कितीतरी जणांना मिळाला. त्यामुळे त्यांच्याविषयी आदर, प्रेम, कौतुक आणि हेवा वाटणार्यांची संख्या काही कमी नाही.
शांताबाई यांनी तसं लिहिलंही खूप. कविता, कथा, कादंबरी, ललित लेखन, गीतं, चित्रपटकथा, अनुवाद, मुलांसाठी कविता-कथा-गोष्टी असं बहुविध स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं आहे. त्यांच्या लेखनासारखाच त्यांचा मनुष्यसंग्रहही दांडगा होता. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी त्यांचा खूप स्नेह-घरोबा होता. ते त्यांना ‘म्हातारी’ म्हणत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक तरुण आपल्या आईचा उल्लेख ‘म्हातारी’ असाच करतात. असो.
शांताबाईंना कशाबद्दल प्रेम नव्हतं! माणसांबद्दल तर त्यांना खूपच प्रेम होतं. ज्येष्ठ साहित्यिकांबरोबरच समकालीन आणि तरुण साहित्यिकांबद्दल त्यांना प्रेम, अगत्य होतं. साहित्याबाहेर त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. असूया, हेवा, मत्सर हे शब्द बहुधा शांताबाईंच्या शब्दकोशातच नसावेत. पण माणसांच्या बरोबरीनं त्यांचं फुलं आणि मांजरं यांच्यावरही तितकंच उत्कट, लुब्ध आणि मंत्रमुग्ध करणारं प्रेम होतं.
अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर आणि पु. भा. भावे हे चार मराठी नवकथेचे शिलेदार. ‘मांजराचा पोर’ ही गोखल्यांची पहिली कथा, गाडगीळांची ‘प्रिया आणि मांजर’ ही पहिली कथा आणि ‘काळ्या तोंडाची’ ही व्यंकटेश माडगूळकरांची (एका कुत्र्याविषयीची) पहिली कथा. नवकथेच्या या तीन शिलेदारांनी आपल्या पहिल्यावहिल्या कथा कुत्र्यामांजराविषयीच लिहाव्यात यात कसला शुभसंकेत होता, माहीत नाही. असं काही शांताबाईंबाबत घडल्याचं ऐकिवात नाही. निदान त्यांचं पहिलं लेखन तरी मांजराविषयीच होतं, याचा पुरावा मिळत नाही. पण हेही तितकंच खरं की, मराठी साहित्यात त्यांच्याइतकं इतर कुणीही मांजराविषयी लेखन केलेलं नाही.
जुन्या पिढीतील एक प्रसिद्ध लेखिका वसुंधरा पटवर्धन यांनी शांताबाईंचे लोभस व्यक्तिचित्र लिहिलं आहे. त्यात त्या म्हणतात – शांताबाईंना फुले जास्त आवडतात की मांजरे जास्त आवडतात, असे विचारले तर उत्तर देणे कठीण जाईल. मांजरावर त्यांचे विलक्षण प्रेम आहे. ते मांजर मग कोणत्याही रंगाचे आणि कितीही कुरूप असो. ते पायात घोटाळणारे, त्यांच्या लेखनावर शाई सांडणारे, पानाशी येऊन जेवणारे, येत-जाता मँव मँव करून त्यांच्या अंगाला अंग घासणारे मांजर शांताबाई लेखन थांबवून त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात बसतील आणि त्यांच्या गोंडेदार शेपटीचे कौतुक करीत राहतील.
शांताबाईंचं मांजरप्रेम जगावेगळं होतं. किंबहुना मराठी साहित्यात त्यांचं हे प्रेम अनोखं म्हणावं असंच आहे. तसं तर मांजराविषयी अनेक मराठी साहित्यिकांनी लिहिलंय. रमेश मंत्रींपासून श्रीनिवास विनायक कुलकर्णींपर्यंत आणि प्रभाकर पाध्यांपासून विजय तेंडुलकरांपर्यंत. आनंद यादव यांनी तर ‘माऊली’ या नावाची एक छोटीशी कादंबरीच लिहिली आहे, तर श्रीकांत बोजेवार यांच्या ‘पावणेदोन पायांचा माणूस’ या राजकीय रूपकात्मक कादंबरीचा नायकच एक बोका आहे. व. बा. बोधे यांचं ‘अथ मार्जारपुराण’ हे त्यांच्या मांजरांवरच्या आठवणीचं पुस्तक आहे. ते एक प्रकारे मांजर-चरित्र म्हणावं लागेल. याचबरोबर मराठीत मांजराविषयी कविता, कथा, ललित लेख आणि कादंबर्याही (संख्येनं कमी असल्या तरी) लिहिल्या गेल्या आहेत.
मात्र एखाद-दुसरा लेख, कथा किंवा कविता लिहिणं वेगळं आणि अनेक लेख, कथा, कविता लिहिणं वेगळं. तशा तर शंकुतला परांजपे यांच्याही मांजरप्रेमाच्या अनेक कथा-दंतकथा सांगितल्या जातात. त्यांनीही तीन-चार लेख मांजरावर लिहिले आहेत. त्यांच्याकडे खूप मांजरं होती, असं म्हणतात. आणि तो वारसा त्यांच्या तिसर्या पिढीत म्हणजे सई परांजपे यांच्या लेकीपर्यंत चालत आला आहे. पण ही गोष्टही तितकीच खरी की, शांताबाईंइतकं मांजरांवर विविध प्रकारचं लेखन मराठीत इतर कुणीही केलेलं नाही. त्यांचं मांजरप्रेम पराकोटीचं, अनाघ्रात आणि सर्वांच्या वरताण होतं.
‘मांजरे : एक सुंदर कोडे’ (‘जाणता-अजाणता’), ‘मांजरे आणि मी’ (‘सांगावेसे वाटले, म्हणून’), ‘शोकान्तिका एका मांजराची’ (‘मदरंगी’), ‘पुन्हा एकदा मांजरे’ (‘ललित नभी मेघ चार’), ‘मूड्स मांजरांचे’ (‘इतस्तत:’), ‘असेही एक इस्पितळ’ (‘आनंदाचे झाड’, अंशत:) असे विविध लेख शांताबाईंनी लिहिले आहेत. ‘लेकुरवाळी’ या कथासंग्रहातली शीर्षककथा मांजराविषयीच आहे आणि त्याच्या मुखपृष्ठावरही चित्रकार रविमुकुल यांनी एक मांजर आणि तिची तीन गोजिरवाणी पिल्लंच काढली आहेत. याशिवाय ‘मांजर’ (‘अनोळख’) यांसारख्या काही कविताही लिहिल्या आहेत.
याशिवाय शांताबाईंचं ‘मांजरांचा गाव’ या नावाचं एक मुलांच्या गोष्टींचं पुस्तक आहे. ‘आपले सोबती’ या बालकवितासंग्रहात ‘बकुळी मांजर’ या नावाची कविता आहे. ‘रंजक गोष्टी’ या मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकात ‘साकुराची मांजरे’ ही जपानी मांजरांची गोष्ट आहे. ‘वेडा वेडा खातो पेढा’ या बाल कवितासंग्रहात ‘मनीमाऊ’ या नावाची कविता आहे. ‘किशोर’ या मासिकातही त्यांनी मांजराविषयी काही गोष्टी-कविता लिहिल्या आहेत.
शांताबाईंना लहाणपणापासून पुस्तकांत काही लक्षणीय आणि चित्तवेधक आढळलं तर ते त्या लिहून ठेवतं. त्याच्या संकलनाचं ‘सुवर्णमुद्रा’ नावाचं त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे. त्यातही मांजर बद्दल उतारे आहेत. मात्र हेही तितकंच खरं की, शांताबाईंनी मांजराविषयी अनेक कविता लिहिल्या असल्या तरी एकही गाणं लिहिलेलं नाही. निदान त्यांच्या ‘श्रावणशिरवा’, ‘रेशीमरेघा’, ‘तोच चंद्रमा’, ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘असेन मी नसेन मी’ या गीतसंग्रहांत तरी त्याबद्दल काही मिळत नाही.
‘मांजरे आणि मी’ या लेखात शांताबाई म्हणतात “मांजरांचा आणि माझा ऋणानुबंध फार जुना, म्हणजे वयाच्या तिसर्या वर्षापासूनचा (अर्थात माझ्या वयाच्या, मांजरांच्या नव्हे) आहे. आई म्हणते, की मी अडीच-तीन वर्षांची होते तेव्हापासून मांजरांचे मला विलक्षण आकर्षण वाटे. आईच्या कडेवर बसलेली मी, एखादे मांजर आसपास कुठे दिसले की अतोनात आनंदाने खिदळू लागे. दोन्ही हात पसरून त्याच्याकडे झेप घेऊ पाही. इतक्या लहाणपणचे मला अर्थातच काही आठवत नाही; पण वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच्या माझ्या मांजरांच्या आठवणी मात्र मनात अगदी स्पष्ट रेखलेल्या आहेत.”
तर ‘पुन्हा एकदा मांजरे’ या लेखात म्हणतात “मांजरांचा व माझा नातेसंबंध केवळ या जन्मीचाच नाही, तर त्याचे माझे जन्मजन्मांतरीचे काही ऋणानुबंध आहेत, असे कधी कधी मला वाटू लागते. मांजराचे एवढे प्रभुत्व आपल्यावर असते हे मला खरे सांगायचे तर आवडत नाही. कधी कधी पाच-पाच, सहा-सहा महिने माझे जीवन संपूर्णपणे निर्मार्जार असते. मला आनंद होतो. मांजरांच्या तावडीतून मी कायमची सुटले आहे, असे मला वाटू लागते. ‘मांजरे लुच्ची असतात, त्यांच्यात कुत्र्याचे इमान, घोड्याचे शहाणपण किंवा गायीची ममता औषधालाही नसते’ अशा लौकिक समजुती मोठ्या आवेशाने मी बोलून दाखवू लागते आणि एकंदरीने मला आता समजूतदारपणा आला आहे, असे घरात सार्यांना वाटून ती सुटकेचा नि:श्वास टाकतात. पण तेवढ्यात एखादे दिवशी घराच्या आवारात, बागेत किंवा रस्त्याच्या कडेला एखादे मळके मांजर मला अकस्मात दिसते. आपल्या हिरव्या किंवा पिवळ्या किंवा घार्या डोळ्यांची स्थिर नजर लावून ते माझ्याकडे रोखून बघत राहते. माझी पावले अडखळून थांबतात. भारल्यासारखी मी तिथेच थबकून उभी राहते. मांजराच्या जादूचा अंमल माझ्यावर चढू लागतो आणि पुन्हा एकदा आपल्या चार पायांनी मांजर माझ्या आयुष्यात प्रवेश करते!”
नवकथाकार यांच्या परंपरतलेच एक कथाकार विद्याधर पुंडलिकही मांजरप्रेमी. शांताबाई त्यांच्याकडे जात तेव्हा त्यांना म्हणत- ‘पुंडलिक, आपण मार्जारकोश करू या ना’. दोघांनी मिळून ठरवलंही होतं. पण दुर्दैवानं तो कोश काही त्यांच्याकडून झाला नाही.
जानेवारी महिन्यापासून प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘रफ स्केचेस’ या नावानं सदर लिहीत आहेत. त्यात त्यांनी 13 जून 2021 रोजी ‘शांताबाई’ या नावाचा एक लेख लिहिला आहे. त्यातल्या काही उल्लेखामुळे अवचटांच्या इतर बहुतेक लेखांप्रमाणे हा लेखही अनेकांना आवडला नाही. पण त्यातलं एक वाक्य लक्षवेधी होतं. ते म्हणजे ‘शांताबाई दोनच चित्रं काढत. एक त्यांच्या लाडक्या मांजरीचं चित्र आणि दुसरी म्हणजे स्मिता पाटील!’ ज्यांना त्यांचं मांजरप्रेम ज्ञात आहे, त्यांना पहिला उल्लेख नक्कीच सुखावून जाईल.
मुळात शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व रसिकतेने ओथंबलेलं होतं. माणसांच्या, पुस्तकांच्या, सिनेमांच्या आणि मांजरांच्या कुठल्याही गुणावर त्या लुब्ध होत. अशी माणसं सगळ्या गोष्टींकडे प्रेमाने पाहतात. त्यांच्या प्रेमाला व्यावहारिकतेच्या, हितसंबंधांच्या आणि हेव्यादाव्याच्या पायर्या नसतात. ही लुब्धता शांताबाईंच्या सगळ्या लेखनातून निरंतर वाहताना दिसते. त्यांच्या लेखनाची जातकुळी कदाचित फार उच्च दर्जाची असेल-नसेल, पण त्यातून पाझरणारा प्रेमाचा झरा मात्र निरंतर, अव्याहत असलेला दिसतो. कवीलोक ही तशी आत्ममग्न जमात असते आणि खूप लेखन करणार्या लेखकांचीही. ललितलेखन हे तर आत्माविष्काराचं प्रकटीकरण असतं. हे सगळं शांताबाईंच्या लेखनातही दिसतं. पण तरीही त्यांच्याकडे अहंमपणा, ‘मी’पणा, शहाजोगपणा, बढाईखोरपणा आणि कोतेपणा कुठेही दिसत नाही. म्हणूनच त्यांना सगळ्याच प्रकारच्या माणसांवर आणि सगळ्याच प्रकारच्या मांजरावर प्रेम करता यायचं.
आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पक्षी, प्राणी यांना महत्त्वाचं स्थान आहे. इतकंच नव्हे तर त्यांना अन्न देण्याच्या कर्माला वेदांमध्ये पंचयज्ञांपैकी एक म्हणजेच ‘वैश्वदेव यज्ञकर्म’ असं म्हटलं आहे. त्यानुसार
– रोज कावळ्याला दाणे टाकल्यानं आपले पितर तृप्त होतात
– रोज मुंग्यांना साखर घातल्यानं कर्ज आणि संकटापासून मुक्ती मिळते
– रोज कुत्र्याला भाकर-पोळी दिल्याने आकस्मिक संकट दूर होतात
– रोज गायीला भाकर-पोळी दिल्यानं आर्थिक संकटं दूर होतात
– रोज कासव आणि माशांना पिठाचे गोळे घालणं हे सर्वांत मोठं पुण्य असतं
ही वेदमहती जर शांताबाईंना कुणी सांगितली असती तर त्या बहुधा म्हणाल्या असत्या की, ‘वेद रचणार्यांचं चुकलंच जरा. यात मांजराचा ही समावेश करायला हवा होता. रोज थोडा वेळ मांजराच्या सहवासात राहिल्यानं माणसाला ‘माणूस’पण येतं!’
[email protected]
सुंदर लेख.शाताबाईंच्या या पैलू बद्दल सविस्तर प्रथमच वाचायला मिळाले. त्यांच्या लेखाशी परिचय होता पण हा लेख वेगळा वाटला.
आवडला.