दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
बिहार सरकारने ओबीसी समूहातील जातनिहाय जनगणना सुरू केल्यानंतर राज्यातही जातनिहाय जनगणना सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. अखेर शनिवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. बिहार सरकार करीत असलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणनेचा अभ्यास करण्यात येणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांसाठी योजना तयार केल्या जाणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने राज्याने जातनिहाय जनगणना करावी, असं म्हटले आहे. बिहार राज्य सरकार सध्या जातनिहाय जनगणना करीत आहे. आम्ही बिहारमध्ये सध्या सुरू असलेली जातनिहाय जनगणना पाहण्यासाठी एक समिती पाठवणार आहोत. ही समिती याचा अभ्यास करणार आहे. हा विषय अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बिहारने नेमकी कशी जातनिहाय जनगणना केली आहे, याची माहिती घेणार असल्याचेही फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. बिहार राज्याने वापरलेले सूत्र, फॉर्म्युला इथं महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का याचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी म्हटले. जर तोच फॉर्म्युला इथं लागू करता येणार नसेल तर महाराष्ट्रात काय करता येईल, हे पाहून त्यानुसार निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.