सौ. अनुराधा चं. भडसावळे | बोधकथा
कथेकरी बुआ ही कथा फार रसाळपणे सांगतात. समर्थांच्या संप्रदायाचा वृक्ष चारी अंगांनी बहरलेला होता. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते – समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून घेत, कामे सांगत. त्यांच्या उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती.
सज्जनगडावरच्या शिष्य परिवारात लहानगा अज्ञानसुद्धा होता. त्याचीच ही कथा. चला जाऊ सज्जनगडावर.
“अरे अज्ञाना, आज जरा अंगण झाडून घे रे. खरंतर अंगणाच्या झाडलोटीची माझी पाळी होती. पण आज तू कर. आणि हो! पूजेसाठी हारसुद्धा कर हं.”
आठ वर्षांचा भोळाभाबडा अज्ञान! कुणीही आपल्या वाट्याचे काम त्याच्या गळ्यात टाकावे आणि ह्या बिचार्याने मुकाट्याने ते पार पाडावे. समर्थांची तर पडतील ती कामे तो आवडीने करायचा. एकदा समर्थ सज्जनगडावर गंगा माहात्म्य व काशी क्षेत्रावर कीर्तन करीत होते. ते ऐकून दुसर्या दिवशी सर्व शिष्य मंडळी समर्थांच्या जवळ आली आणि आम्हाला काशीयात्रेला न्या, असा आग्रह करू लागली. समर्थांनी शिष्यांसह वाराणसीला तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले.
काही दिवसांनी समर्थांनी गडावरील सर्व शिष्यांना पुढ्यात बसवून घेतले आणि सांगितले, “पुढच्या पौर्णिमेला आपण काशीला प्रस्थान ठेवायचे. कोण कोण येणार यात्रेला?”
सगळ्यांनीच लगबगीने मी मी म्हटले. अज्ञानसुद्धा आनंदाने नाचत नाचत म्हणाला, “मी पण येणार स्वामी!”
तेवढ्यात कुणीतरी म्हणाले, “अरे आपण सगळेच गेलो तर मग इथे गडावर कोण? इथली श्रीरामांची पूजा, नैवेद्य, बाकीची व्यवस्था?” सगळे जण एकदम चिडीचूप झाले.
कधी नव्हे ते समर्थ लहानग्या अज्ञानाकडे पाहून म्हणाले, “अज्ञाना, तू थांबशील का रे इथे?” टचकन पाणीच आले बिचार्याच्या डोळ्यात!
तो जिथे गुरुबंधूंनी सांगितलेल्या कामांना नाही म्हणू शकायचा नाही, तिथे प्रत्यक्ष गुरूंना कसला नाही म्हणतो? पण गुरुजींनी आपल्याला विचारले ह्या आनंदात पटकन तो ‘हो’ म्हणाला.
हा हा म्हणता जायचा दिवस उजाडला. सर्व शिष्य प्रस्थानासाठी तयार झाले. समर्थांची स्नानसंध्या, नित्य उपासना, पूजा मनोभावे पूर्ण झाली. तेसुद्धा निघाले. रामदासस्वामींनी अज्ञानाच्या खांद्यावर हात ठेऊन सांगितले, “बाळा, आम्ही 6 -8 महिने बाहेर चाललोय. रामाचे सगळे मनापासून नीट कर बरं! श्रीरामांची सेवा कशी करशील?”
“हे बघ, पंच पंच उष:काली उठायचं, झाडलोट, सडासंमार्जन, पूजा, काकड आरती करायची. लाकूडफाटा आणायचा. आपल्या संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागून आणायची, स्वयंपाक करायचा. नैवेद्य देवाला अर्पण करून तो जेवला की आपण जेवायचे. इतर सर्व कामे राहिली तरी चालतील, पण माझ्या रामरायाला मात्र उपाशी ठेवू नकोस. कळले ना सगळे? सगळे काळजीपूर्वक कर हो.”
अज्ञान जड अंतःकरणाने ‘हो’ म्हणाला. त्याने समर्थांच्या चरणी दंडवत घातले आणि सगळे दिसेनासे होईपर्यंत तिथेच दारात उभा राहिला.
दुसर्या दिवशी अज्ञान अगदी लवकर उठला. सगळी पूजा झाल्यावर त्याने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुतीराय यांची पाने मांडली. नैवेद्य दाखवला व मंदिराचे दार लावून घेतले. देव जेवायची बाहेर थांबून वाट बघत बसला. पण कुणीच जेवायला येईना. त्यामुळे तोसुद्धा उपाशी राहिला.
याप्रमाणे सात दिवस निघून गेले. देव काही जेवेना. शेवटी अज्ञानाने प्राण पणाला लावले.
तो म्हणाला, “देवा, आज सात दिवस तुम्ही उपाशी आहात आणि मीही उपाशी आहे.
आता मात्र तुम्ही जेवायला आला नाहीत तर तुमच्या पायावर डोके आपटून प्राण देईन.”
असे म्हणून त्याने खरोखरच आपले मस्तक रामरायाच्या पायांवर आपटण्याकरिता पवित्रा घेतला. श्रीरामांनी त्याला वरचेवर झेलला.
“अरे बाळा, कलियुगात कधी देव जेवतो का?”
“ते मला काही माहिती नाही. माझ्या गुरूंनी सांगितलंय. तुम्हाला जेऊ घालायचे, मगच आपण अन्नग्रहण करायचे. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. तुम्ही जेवायलाच हवे, तरच मला जेवता येईल.”
“बरं बसतो. नैवेद्य ग्रहण करतो. मग तर झालं?”
“नाही नाही असं एकट्याने कसे खाणार तुम्ही? सीतामाई, लक्ष्मणदादा, भरत, शत्रुघ्न, मारोतीराय सगळे मिळून पंगत करू.”
आणि तसेच झाले. त्या दिवसानंतर रोजचा परिपाठच पडला. दुपारी बहारदार पंगत व्हायची.
8-10 दिवस गेले. एक दिवस सकाळी अज्ञान उठलाच नाही. झोपून राहिला. श्रीराम काळजीत पडले.
“जा लक्ष्मणा, बघून ये त्याला काय झालेय ते.”
सगळे जण चौथर्यावरून खाली उतरले. सीतामाईंनी त्याचे डोके मायेने मांडीवर घेतले. श्रीराम जवळ बसले.
“अरे ऊठ ना बाळा.”
“मी नाही उठणार जा आज. मी खूप दमून गेलोय. रोज सगळी कामे मी एकट्याने करायची. दमतो ना मी. मला सांगा सगळीकडे झाडलोट करणे, फुले आणणे, हार करणे, लाकूडफाटा आणणं, पाणी भरणं, स्वयंपाक कोण करतं? घरातले सगळे काम वाटून घेतात नं? पहाटेपासून सगळी कामं करून दमून जातो. तुम्ही पण मदत करा ना.”
श्रीरामरायांना त्या लहानग्याचे बोलणे पटले.प्रभूंना मारुतीराय म्हणाले, “हे काम काही वेगळंच दिसतंय. तुम्ही जपूनच त्याच्या मागण्या मान्य करा बरं!”
“असू दे रे, लहान आहे. करू मदत त्याला.”
आणि मग प्रत्यक्ष मारुतीराय गडावर रोज पाणी शेंदू लागले. लाकडे फोडू लागले. झाडलोट करू लागले. त्यांना ही कामे करायला काहीच वेळ लागत नसे. लक्ष्मण चौथर्यावरून खाली उतरून गंध उगाळणे, फुले आणणे, हार करणे, प्रभूंच्या वस्त्रांची देखभाल, भाजीपाला आणणे ही कामे सांभाळू लागला. भरत शत्रुघ्न पूजा-अर्चा करू लागले. सीतामाई सर्वांसाठी स्वयंपाक करू लागल्या. मग मिस्कील हसून प्रभू म्हणाले, “अज्ञाना, अरे मला काहीच काम नाही का?”
“नको. मी तुम्हाला काम सांगणार नाही. तुम्ही माझे आराध्य आहात. शिवाय तुम्हाला काम सांगितले तर गुरुजी रागावतील. पण तुम्ही एक करा. ब्राह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी आपले आपण उठून आवरून घ्या. स्नान करून स्वच्छ नवीन कद नेसून आपणच आपले गंध वगैरे लावून घ्या. आणि आपल्या जागेवर उभे राहा आणि त्यातून काही काम करावेसे वाटले तर एखाद्या वेळी काकड आरती आपण करा.”
“आणि तू काय करशील?” प्रभू हसून उद्गारले.
“मी तुमची सर्वांची मनोभावे पूजा करेन. नैवेद्य दाखवीन. नामस्मरण करेन. मला दासबोधाचे वाचन, पारायण करायचे काम गुरुजींनी दिलेच आहे.”
आता कामाची घडी छान बसली. सगळे कसे वेळच्या वेळी व्हायला लागले. त्यावेळी गडावर पंगतीचा थाट काही औरच असे.
सीतामाई गरम गरम स्वयंपाक करून वाढत असत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघन जेवत असत. मारुतीराय वारा घालत असतं. थोड्या वेळाने मारुतीराय, सीतामाई आणि अज्ञान जेवत असत. जेवल्यानंतर सगळे मिळून आवरून ठेवत.
असेच दिवस गेले. आठवडे गेले. महिने सरले आणि एक दिवस जेवायला बसल्यावर सीतामाईने राम-लक्ष्मणांच्या पानात भाकरीचा काला वाढला. ते पाहिले, मात्र अज्ञान एकदम रडायलाच लागला. रामचंद्र हातातला घास खाली ठेऊन त्याला विचारू लागले, “काय झाले अज्ञाना?”
सीतामाई म्हणाल्या, “रात्रीच्या भाकरीचा नैवेद्याला काला केला. ते आवडले नाही का तुला?”
डोळे भरून आलेला अज्ञान मुसमुसत म्हणाला, “तसे नाही हो सीतामाई. अहो तुमच्या हातचा काला कुणाला आवडणार नाही?”
“अरे मग झाले तरी काय?”
“हा काला माझ्या गुरूंना फार आवडतो. त्यांना द्यायला हवा. त्यांच्याशिवाय आपण खाल्ला असं नाही चालणार!”
रामचंद्र म्हणाले, “अरे पण आपण गडावर, ते काशीला. कसा देणार त्यांना?”
“प्रभू, तुम्हाला काय अवघड आहे? मला माहिती आहे, मारुतीरायांनी तर द्रोणागिरी उचलून आणला होता. तुम्हाला आणि लक्ष्मणदादांना खांद्यावरून नेले होते.”
एवढे म्हणून त्याने मोठ्ठे भोकाड पसरले. थांबेच ना. शेवटी प्रभूंनी महाबली हनुमंतांना अज्ञानाला समर्थांकडे घेऊन जाण्याची आज्ञा केली. हनुमंत म्हणाले, “स्वामी, तरी मी तुम्हाला आधीच सावध केले होते, आठवतंय ना?”
मारुतीरायांच्या खांद्यावर जिथे महर्षी वशिष्ठ, राम-लक्ष्मण बसले तिथे गुरुभक्तीमुळे अज्ञान जाऊन बसला. त्याच्या खांद्यावर काल्याचे पातेले.
हनुमंत म्हणाले, “अज्ञाना, मी तुला समर्थांकडे नेतो आणि दुरून समर्थ कुठे आहेत ते दाखवितो. त्यांनी तू कुणाबरोबर आलास असे विचारले, तर माझे नाव सांगू नकोस.”
समर्थ त्या वेळी काशीहून अयोध्येला आले होते. शरयूतीरावर स्नान करीत होते. तिथे मारुतीने अज्ञानाला सोडले.
“ते बघ तुझे गुरू तिथे आहेत. पण लक्षात ठेव त्यांना माझे नाव सांगायचे नाही.”
गुरुमाउलींकडे हा पातेले घेऊन धावत गेला. त्यांच्या चरणी लोटांगण घातले.
“गुरुमाऊली, सीतामाईने भाकरी, दही, दूध, ताक, लोणी घालून काला केलाय. तुम्हाला आवडतो म्हणून घेऊन आलोय.”
अज्ञानाला पाहताच सर्व शिष्य आजूबाजूला गोळा झाले. समर्थ म्हणाले, “अज्ञाना, गड सोडून आलास ना? माझ्या रामरायाची पूजा-अर्चा?”
अज्ञान म्हणाला, “आतापावेतो ठीक आहे.”
“आतापर्यंत म्हणजे? तू निघालास केव्हो?”
अज्ञान म्हणाला, “आताच.”
“आणि आलास केव्हा?”
“आताच!” अज्ञान म्हणाला.
“अरे पण आताच निघालास आणि आताच आलास म्हणजे काय? अरे पण तू इथे आलास कसा?”
अज्ञान म्हणाला, “माझं नाव सांगू नकोस म्हणून त्यांची आज्ञा आहे. त्याने मारुतीच्या रूपाचे वर्णन केले. ते नाही का रामरायासमोर हात जोडून उभे असतात, लांब शेपटी असलेले, महापराक्रमी, भुभुक्कर करतात, ज्यांनी लंका जाळली ते घेऊन आले.” त्याने खुणेने दाखवले.
“मारुतीराय?” समर्थांच्या डोळ्यात पाणी तरळले.
“अरे बाळा, सडासंमार्जन, लाकूडफाटा, माधुकरी-भिक्षा, स्वयंपाक, पूजा, आरती करतोस ना सगळं?”
“मी एकटा नाही करत; सगळे मिळून कामे वाटून घेतली आहेत.”
अज्ञानाने गडावरच्या कामांच्या वाटणीची हकिकत सांगितली. समर्थांचे डोळे भरून आले. स्वामींनी अज्ञानाला प्रेमानं जवळ घेतले. मग धावत मारुती जवळ आले आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवले.
“माझ्या शिष्याकरिता आपल्याला खरोखर फार कष्ट पडले. क्षमा करा त्याला.” एवढे म्हणेस्तोवर मारुतीराई आज्ञानासह अदृश्य झाले.
समर्थांनी अज्ञानाचे सामर्थ्य शिष्यांना दाखविले आणि ते गडाकडे परतले.
आपल्या गुरूंवरील अतुट विश्वास, आज्ञापालन व भगवंतावर भोळी पण निष्काम भक्ती असेल तर अशा शिष्याचे प्रत्यक्ष भगवंतालाही ऐकावे लागते.
धन्य ते श्रीगुरू समर्थ, ज्यांनी आपल्या अज्ञानी भक्ताला श्रीरामांची प्राप्ती करून दिली.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥