दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
अभिनय कट्ट्यावर रविवारी शिक्षक दिनानिमित्त माझे शिक्षक माझे संस्कार या कार्यक्रमाचे आयोजन किरण नाकती यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. तत्त्वातून मूल्य जपणारे असतात ते शिक्षक, आईवडिलांनंतर असतात ते शिक्षक. या शिक्षकांच्या ऋणातून आपण आजन्म मुक्त होऊ शकत नाही. परंतु त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या आजवरच्या शिक्षणसेवेच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी किरण नाकती यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमात अशोक टिळक, श्रीकांत कढे, नीला लुमण, शीला बर्वे, मंजिरी दांडेकर, शीला वागळे, पूर्णिमा दळवी, शुभदा देशपांडे, अंजुषा पाटील, मनीषा रानडे, दीपक धोंडे आदी ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
आजपर्यंत या सर्वांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यात आले. एक चांगली पिढी घडविण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले आहे. हा सन्मान त्यांच्या आजवरच्या कार्याचा आहे.
आदित्य प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेचे संस्थापक किरण नाकती यांनी प्रत्येक शिक्षकाचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
किरण नाकती आणि त्यांच्या सहकार्यांचे शिक्षकांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन नीता रामतीर्थ व आदित्य नाकती यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, दिव्यांग कला केंद्र संचालिका संध्या नाकती, संस्थापक किरण नाकती आणि सदस्य उपस्थित होते.
किरण नाकती यांच्याबाबत आपण पाहिलं की अनेकविध कल्पना घेऊन ते काम करतात. विशेषतः रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत होत असलेले कार्य व अभय देणारी संकल्पना आहे. आज निवृत्तीनंतरही आम्हा शिक्षकांची आठवण ठेवून आम्हाला आमंत्रित केले आणि सन्मानित केले याबद्दल आभार.
– अशोक टिळक