दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
शिक्षक भारतीच्या उमेदवारांना विजयाची खात्री असल्याचा विश्वास शिक्षक भारतीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष एकनाथ तारमळे यांनी व्यक्त केला आहे.
जुनी पेन्शन योजना नाकारणे, शाळांना वेतन अनुदान नाकारताना शिक्षकांना घरकोंबडे, कामचुकार अशा शब्दांनी अवमानित केले जात आहे. त्यांना निवासी राहण्याची सक्ती करत व अन्यथा घरभाडे कपात करण्याची धमकी देण्यात येत आहे. शाळा बंद करण्याचा प्रयत्न, वर्ग तुकड्यांना मान्यता न देणे, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करणे अशा अनेक कारणांनी राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर दुखावले आहेत.
आमदार कपिल पाटील यांच्यासारखे शिक्षक आमदार शिक्षकांच्या न्यायहक्काबाबत सतत आवाज उठवतात. असे आवाज दाबण्यासाठी शिक्षक व पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी अवाजवी व अनाठाही मागणी करून शिक्षकांच्या प्रतिनिधित्वालाच आव्हान देण्याचे काम काही राजकीय लोक करीत आहेत. यामुळे सर्वच शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या निवडणुकीमध्ये शिक्षक चळवळीतील धनाजी पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडून देऊन शिक्षकांची ही खदखद बाहेर पडेल यात कोणतीही शंका नसल्याचे मत शिक्षक उघडपणे व्यक्त करीत आहेत, असे तारमळे यांनी सांगितले.
केवळ शिक्षक भारतीचाच उमेदवार शिक्षण, शिक्षक व शाळा वाचवू शकेल, असा ठाम विश्वास असल्यानेच एक आक्रमक शिक्षक संघटना म्हणून शिक्षक भारतीचा प्रभाव सतत वाढत आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष, तमाम शिक्षकांसाठी एक झुंजार नेतृत्व असलेले उमेदवार धनाजी पाटील व नागपूर मतदारसंघात डॉ. राजेंद्र झाडे हे दोघेही उमेदवार विजयी होऊन शिक्षकांना अवमानित करणार्या आणि केवळ पक्ष मनोवृत्तीच्या पाठिंब्यावर उभे राहिलेल्या उमेदवारांना धडा शिकविणार, असे एकनाथ तारमळे यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शिक्षक दोन्ही उमेदवारांचा विजय खेचून आणतील, असे म्हटले आहे.
कोकण व नागपूर शिक्षक मतदारसंघातील शिक्षक कोणत्याही आमिषाला बळी न पडता या वेळी शिक्षक भारतीच्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करतील आणि तमाम दुखावलेल्या शिक्षकांचे अश्रू पुसून शिक्षकांची चेष्टा करणार्यांना धडा शिकवतील, असा विश्वास आहे.
– एकनाथ तारमळे अध्यक्ष, शिक्षक भारती, ठाणे जिल्हा