दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर।
इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग लावून पेटवून दिल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर रामदेव अपार्टमेंट इमारत आहे. रविवारी मध्यरात्री इमारतीमध्ये राहणारा विजय बालानी ह्या इसमाने लायटरच्या साहाय्याने उभ्या असलेल्या दुचाकींना आग लावली. ह्या आगीत पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. विजय बालानी याने ही आग का लावली, याबाबतचे कारण अजून अस्पष्ट असून त्याच्याविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुचाकी पेटवून दिल्याने मोठ्या प्रमाणात इमारतीमधील सदनिकाधारकांचे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेचा अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक महेश बंडगर हे करीत आहेत.