दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीतून सकस आहार जवळपास दुरपास्त होत चालला आहे. सकाळचा नाष्टा करणे अनेक जण टाळतात, तर काही जण नाश्त्यामध्ये बटाटा, वडा, समोसा, भजी अशा तेलकट पदार्थांचे सेवन करतात. मात्र थंडीच्या काळात काही सोप्या पद्धतीचा आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम असलेला आहार शरीराला लाभदायक ठरेल. मोड आलेल्या कडधान्यांमुळे जीवनसत्त्वांचा थंडीत पोटाला मोठा आधार होतो.
या मोड आलेल्या धान्यांमध्ये बीन्स, वाटाणे, हरभरा, मूग, सोयाबीन, राजमा, मटार यांचा समावेश आहे. तसेच ब्रोकोली, मुळा, हिरवी भाजी आणि मेथी या पालेभाज्याही आहेत. कडधान्यांमध्ये मका, तांदूळ, शेंगदाणे, मुळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बियाही पोषक द्रव्ये शरीराला देतील.
मोड आलेल्या कडधान्यांचा शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो. मोड आलेली ही सर्व कडधान्ये पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्वचेसाठी रामबाण औषध म्हणून मोड आलेली कडधान्ये मानली जातात.
मोड आलेल्या कडधान्यांत क्लोरोफिल असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच रासायनिक घटकांमुळे पचनक्रिया सुधारते. नियमित आणि संतुलित आहारात मोड आलेली कडधान्य आरोग्याला पोषक ठरतील. एका ठरावीक वयानंतर वजन वाढण्याची चिंता असते. ही समस्या टाळण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा नाश्ता हे एक चांगले पाऊल ठरू शकते.
डोळ्यांसाठीही फायदेशीर
कडधान्यात अ जीवनसत्वाने समृद्ध असतात. व्हिटामिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. रातांधळेपणापासून बचाव करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केला जातो. यामुळे दृष्टी उजळते; याशिवाय मेंदूच्या आरोग्यासाठी व्हिटामिन फायदेशीर आहे. वृद्ध व्यक्तींनी नियमित मोड आलेली कडधान्ये खाल्ली तर त्यांना मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी असते.