दिनमान प्रतिनिधी
विरार|
नवघर माणिकपूर शहरामध्ये दुचाकी पार्किंगवर होणार्या कारवाईविरोधात भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी निदर्शने केली. एच प्रभाग समितीच्या पालिका कार्यालयासमोर सकाळी आयोजित आंदोलनामध्ये शहरांमध्ये केवळ दुचाकीवर कारवाई करून जबर दंड आकारणीविरोधात टोईग व्हॅन बंद करण्यात याव्यात, या मागणीसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.
सध्या गणेशोत्सवाचं वातावरण असून सर्वसामान्य नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरांमध्ये केवळ दुचाकी गाड्या नो पार्किंगमध्ये असल्याचे कारण देऊन ७०० रुपये दंड आकारणी केली जाते. एखादी वस्तू घेण्यासाठी गरीब व सर्वसामान्य नागरिक आपल्या वाहनावरनं उतरून दुकानात गेला असता त्याची दुचाकी उचलून जप्त केली जाते. हे वाहने सोडवण्यासाठी वाहनधारकाला जबर भुर्दंड पडतो.
आधी वाहनतळ निश्चित करा, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. त्यानंतरच अशा स्वरूपाची कारवाई करा. तोपर्यंत कुठल्या स्वरूपाची कारवाई करू नका, या मागणीसाठी भाजपा शहर नवघर माणिकपूर कार्यकारिणी यांनी महापालिकेकडे निवेदन सादर केले.
पालिका प्रशासनाने शहरामध्ये कुठल्याही स्वरूपाची पार्किंगची उपाययोजना केलेली नाही. त्यातच वाहने उचलून कारवाई सुरू केली जात आहे. यामुळे करदात्या नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे.
याप्रसंगी पालिका कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलनही केले. या वेळी वसई विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मनोज पाटील, शहराध्यक्ष महेश सरवणकर, बाळा सावंत, शहर उपाध्यक्ष नीलेश वर्तक, मुकुंद मुळे, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.