दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
डोंबिवली वाहतूक विभाग व डोंबिवली एनफिल्ड क्लब, डोंबिवली रायडर्स क्लब यांच्यातर्फे वाहतूक जनजागृतीसाठी डोंबिवली वाहतूक विभाग येथून डोंबिवली पश्चिम, ठाकुर्ली ब्रिज, फडके रोड, टिळक चौक, घरडा सर्कल अशी बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये 50 बाईक रायडर्संनी सहभाग घेतला.
यावेळी म्हसोबा चौक, डोंबिवली पूर्व येथे हिरकणी प्रतिष्ठान, डोंबिवली यांच्यातर्फे म्हसोबा चौक ते घरडा सर्कल अशी सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये 20-30 महिलांनी सहभाग घेतला. घरडा सर्कल येथे आर्मी डे निमित्ताने सर्वांनी मेजर विनय सच्चान यांचे स्मारकास आदरंजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी वेदांत कुलकर्णी याने केले. यावेळी विवेक पंडीत, विद्यानिकेतन शाळा यांनी आर्मी डे चे महत्व पटवून देऊन सर्वाना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. लेखक दुर्गेश परुळेकर यांनी डोंबिवली सारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये सर्वांनी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळायला हवेत, असे आवाहन केले. कल्याण डोंबिवली महापालिका सचिव संजय जाधव यांनी डोंबिवली वाहतूक विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. काही दिवसांपूर्वीच कल्याण येथील भाविकांचा शिर्डी येथे जाताना अपघात घडल्याच्या दुःखद घटनेची आठवण करून देत वाहतुकीचे नियम आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान वाहतूक जनजागृती करिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.