दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड येथे होत असलेल्या भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) रविवार, १९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवार उपस्थित राहणार आहे.
भूमिपूजन सोहळा वर्तकनगर येथील विद्यालयाच्या बांधकामस्थळी होणार आहे. त्याचबरोबर पोखरण रोड नं. ०१ येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी ११वाजता होईल. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा तसेच अमृत २.० योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्यनगर, घोडबंदर परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत रेलिंग लावणे या कामांचा ऑनलाइन पद्धतीने आरंभ मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ गायिका श्रीमती उषा मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयूरेश पै यांची विशेष उपस्थिती असेल. तसेच खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार प्रमोद पाटील, आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची या सोहळ्यास उपस्थिती असेल.