दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
ठाणे परिवहन विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारांना पगारवाढ तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून आंंदोलनाचे हत्यार उपसणार्या कर्मचार्यांना बाप्पा पावला आहे. मंगळवारपासून कामावर हजर राहणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. थकीत वेतन आणि तुटपुंज्या मानधनावर काम करणार्यांच्या मागणीवरून परिवहनचे कंत्राटी कामगार शुक्रवारपासून संपावर गेले होते. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात कामगार आणि प्रशासनाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत तोडगा निघाला असून येत्या पगारात कर्मचार्यांच्या मानधन वाढ करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठाणे परिवहनच्या तब्बल ३६० कंत्राटी कर्मचार्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता. घोडबंदर रोडच्या आनंदनगर आगारातील महिला व पुरुषांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत ठाणे परिवहनचे जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
कर्मचार्यांना काय मिळाले आश्वासन?
गणवेश भत्ता, रजा वेतन, सानुग्रह अनुदान आणि ग्रॅच्युइटी येत्या महिन्यातील पगारात मिळवून देण्याचे आश्वासन परिवहन कर्मचार्यांना देण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांच्या पगाराच्या स्लीपवर असलेल्या रकमेच्या अर्धेच पैसे कामगारांना मिळतात. उरलेले पैसे कोणाच्या खिशात जातात, यावर कामगारांची नाराजी आहे.