दिनमान प्रतिनिधी
बदलापूर|
अंबरनाथ आणि बदलापूरसह उल्हासनगर शहरासाठी संयुक्तपणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू आहे. मात्र ज्या भूमीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे, त्या बदलापूर शहराच्या कचराभूमीवर सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. येथील कचरा पेटत असल्याने आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरतात. मात्र नागरी वस्ती जवळ नसल्याने पालिकेचे फावते आहे. शहरापासून दूर असल्याने कचर्यावर प्रक्रिया करण्याऐवजी पेटवून देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.
बदलापूर शहराचा कचरा शहरातून उचलून शहरातील नागरी वस्तीपासून दूर असलेल्या एका दगडखदाणवजा जमिनीवर टाकला जातो. नागरी वसाहत या कचराभूमीपासून दूर आहे. त्यामुळे कचराभूमीचा थेट त्रास होत असल्याच्या तक्रारी कमी आहेत. कचराभूमीला आग लागल्यास त्याचा त्रास नवीन वडवली, साई वालिवली गावांतील ग्रामस्थांना होतो. याच कचराभूमीवर अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. अंबरनाथ शहरासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. पालिकेची अस्तित्वात असलेली कचराभूमी नागरिकांच्या डोक्याला ताप ठरली आहे. मात्र आता ज्या भूमीवर संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे त्या कचराभूमीला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आग लागत असल्याचे समोर आले आहे.
या आगीमुळे नवीन वडवली आणि साई वालिवली गावांत धुराचे लोट पसरत असल्याचे दिसून आले आहे. या कचराभूमीशेजारी दगडांची खाण असून तेथे स्फोट होत असतात. त्यामुळे येथे उडणारी धूळ आणि कचराभूमीचा धूर सहजासहजी दिसून येत नाही. मात्र कचराभूमीच्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या कचराभूमीतून धूर निघत असून कचराभूमी धुमसत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे ज्या आगीच्या प्रश्नामुळे अंबरनाथमध्ये नागरिकांमध्ये संताप आहे. त्याच समस्येने बदलापूरच्या कचराभूमीला ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा पेटतो की पेटवला जातो, असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
वाढत्या उष्णतेमुळे कचराभूमीला आग लागण्याची शक्यता आहे. कचराभूमीवर उष्णतेमुळे वायू तयार होत असतो. तसेच काही व्यक्तीही आग लावत असल्याचाही संशय आहे.
– योगेश गोडस मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका