दिनमान प्रतिनिधी
ठाणे। आज 73 वा प्रजासत्ताक दिन. संविधान हा शब्द सर्वांनाच माहिती आहे. पण भारतीय संविधान म्हणजे नक्की काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, कोणत्या पार्श्वभूमीवर हे संविधान तयार झाले आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या, तुमच्या आणि सर्वांसाठी आवश्यक असे त्यात काय आहे. अशा सर्व गोष्टींचा संविधानिक मराठा मंडळ ठाणेतर्फे उलगडा करण्यात आला.
सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेली 61 वर्षे कार्यरत मराठा मंडळ ही संस्था कार्यरत आहे. भारतीय संविधान या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झेंडावंदन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय संविधान विषयी माहिती देण्यासाठी मंडळाने अॅड. समीर कांबळे, संचालक, ढगडइ बँक यांना निमंत्रित केले होते. हा विषय जास्तीत जास्त सामाजिक घटकांपर्यंत पोहोचावा, त्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी ठाण्यातील सामाजिक, सांस्कृतिक, व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध मान्यवर संस्थांच्या प्रमुख मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते.
अॅड. समीर कांबळे यांनी संविधानाची निर्मिती, त्याची पार्श्वभूमी यासंबंधी अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत मांडणी केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या प्रस्तावनेचा ठराव मांडताना आपल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचा केलेला उल्लेख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर केलेल्या भाषणातील सामाजिक व आर्थिक लोकशाही आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग यासंबंधी केलेला उल्लेख याचे दाखले त्यांनी दिले. न्याय, स्वातंत्र्य व समता याची ग्वाही घटना देते. मात्र यासाठी बंधुभाव असण्याची आणि तो जोपासण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. घटनेने सर्वांना मूलभूत अधिकार देऊ केले आहेत. मात्र ते तेव्हाच मिळू शकतील जेव्हा प्रत्येक जण आपल्या कर्तव्याचे पालन करेल असे समीर कांबळे यांनी सांगितले.
यावेळी अॅड. समीर कांबळे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच हरित लवादाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले निवृत्त न्यायाधीश जस्टिस उमेश साळवी, सदानंद राणे, मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, राजेंद्र साळवी यावेळी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले काव्य- लेखन स्पर्धेच्या भारती जगताप आणि स्नेहा साळुंखे या विजेत्यांना याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी त्यांनी मूळ हस्तलिखित घटनेची प्रत सर्वांना दाखविण्यासाठी आणली होती. त्यातील पानांचा उलगडा करीत त्याबद्दल माहिती दिली. भारतीय राज्यघटना ही आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी आहे आणि म्हणूनच मूळ प्रतीवर आपल्या राष्ट्रपुरुषांची चित्रे आहेत. जसे प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, झाशीची राणी. उपस्थित सर्वांनी ही प्रत प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतला.