दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एप्रिल २०२० मध्ये आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती.
आव्हाड हे मंत्री असताना ५ एप्रिल २०२० मध्ये करमुसे यांना मारहाण झाली होती. ही मारहाण आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याचे आरोप करत करमुसे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात यापूर्वी तीन आरोपपत्र दाखल आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा ठाणे पोलिसांनी पुन्हा तपास करत तीन महिन्यांच्या आत न्यायालयात आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. तपासामध्ये आणखी दोन पोलिसांची नावे समोर आली असून या गुन्ह्यात दोन नवीन कलमे वाढवण्यात आली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नवीन वाढलेली कलमे व पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या भक्कम तांत्रिक पुराव्यांमुळे या प्रकरणातील आव्हाड यांच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी या प्रकरणाचा तीन महिन्यांमध्ये तपास पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला. साहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्याने करमुसे मारहाणप्रकरणाचा सखोल तपास करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच २२ मे रोजी ठाण्याच्या जेएमएफसी न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. जवळपास ४०० पानांचे दोषारोपपत्र होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोड परिसरात वास्तव्यास असलेले अनंत करमुसे यांनी तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टवरून ५ एप्रिल २०२० रोजी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून यामध्ये आव्हाड यांच्यासह एकूण १३ आरोपींना अटक झाली होती. आरोपींमध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. नंतर सर्वांना जामीन मिळाला. यातील एका पोलिस कर्मचार्याने गेल्याच महिन्यात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी असल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, यासाठी करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.