दीपक हिरे
वज्रेश्वरी|
भिवंडी ग्रामीणमध्ये भातशेतीसह फुलशेतीला यंदा लहरी पावसाचा फटका बसला आहे. गणेशोत्सवात झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा, जास्वंद, जरबेरा अशा फुलांच्या विक्रीतून शेतकर्यांना चांगला नफा मिळतो. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले नसल्याने परिसरातील बाजारपेठा कृत्रिम फुलांनी बहरल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त कृत्रिम प्लास्टिक फुलांना आणि विविध वस्तूंना मागणी वाढली आहे. एकदा घेतलेल्या वस्तू वारंवार पुनर्वापर होत असल्याने अशा खरेदीकडे कल वाढला आहे.
कधीकाळी फुलांचे गाव म्हणून ओळख असलेल्या गणेशपुरी, घोटगाव, वेढेपाडा, दुगाड, दाभाड, खरीवली, कुंदे या भागांत फुलांची शेती मोठ्या प्रमाणावर होत असे. अशा नैसर्गिक फुलांच्या भागात सुद्धा कृत्रिम प्लास्टिक फुलांची शेती बहरली आहे.
सार्वजनिक मंडळांसह घरगुती आराससाठी कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. त्यांना होणारी मागणी लक्षात घेता प्लास्टिक पानाफुलांच्या विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहेत. वाडा-भिवंडी रोडलगत ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अंबाडी नाका ही मुख्य बाजारपेठ ठरत आहे.
गणेशोत्सवात तोरण, गालिचे, माळ, हार, लड, फूल अशा विविध वस्तू खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नैसर्गिक फुलांची आवक कमी झाल्याने त्यांचे दर वाढले आहेत. सामान्य नागरिकांना नैसर्गिक फुलांचे हार, तोरण, माळा घेणे शक्य होत नाही. दिवाळी, दसरा,
नवरात्री यासाठीही त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. यातून भक्तांचा ओढा कृत्रिम फुलांकडे वाढला आहे.
कृत्रिम फुले आणि वस्तू दर
हार १० ते १२५ रु.
फुल लड ३० ते २०० रु.
गुलाब, जरबेरा फुल ६० ते ९० रु. डझन
वेल जाळी ३५० अडीच फूट
वेल पीस १०० रु. पीस
तोरण ६० ते १ हजार रु.
झेंडू फुल १२० रु. पाकीट
कमल फुल ३५ रुपये पीस
गालिचा ८० रुपये
ग्रास गालिचा ८० रुपयांपासून पुढे
सूर्यफूल १२० रुपये डझन
मोतीहार १० ते १३०
ठाण्यात इकोफ्रेंडली मखर खातेय भाव
दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत गणपती आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदाही थर्माकोल आणि प्लास्टिक बंदी असल्याने गणेशभक्तांनी इकोफ्रेंडली मखरांना पसंती दिली आहे. थर्माकोल आणि प्लास्टिक बंदीचा फायदा इकोफ्रेंडली सजावटकारांना झाला आहे. ठाण्यातील बाजारपेठेत मोहम्मद अली रोड, खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा परिसरात इकोफ्रेंडली मखर बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. लाकडी पट्ट्या, प्लायवूड आणि सुती, कागदी फुलांच्या माळा व कापडाच्या मदतीने सुंदर आरास केली जात आहे. इकोफ्रेंडली मखर अगदी वाजवी दरात मिळत असून, ते गणेशभक्तांना परवडेल अशा दरात उपलब्ध आहे. अगदी ५०० पासून ५ हजारांपर्यंत मखर तयार आहे. यामध्ये मोराचे नक्षीकाम, होडी, मंदिरांची आरास ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे मखर हाताळण्यास अगदी सुलभ असून, सुरक्षित जपून ठेवल्यास ते पुढील पाच वर्षांपर्यंत सहज वापरता येईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.