दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर|
शहरातील वाहतूक पोलिस मनमानी आणि चुकीच्या पद्धतीने वाहनचालकांकडून ई चलन व दंड आकारणी करीत असून, त्यांना वाईट पद्धतीची वागणूक देत आहेत, असा आरोप मनसेच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष काळू थोरात यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. या वेळी वाहतूक पोलिसांनी गोरगरीब रिक्षाचालकांना सहकार्य करावे, सौहार्दाने वागावे, यासाठी गुलाब पुष्पही देण्यात आले.
वाहतूक पोलिस हे वाहनचालकांवर कारवाई करीत असताना त्याचे फोटो अथवा चित्रीकरण स्वतःच्या खासगी मोबाइल फोनने करीत असतात. त्याऐवजी ई चलान मशीनद्वारे फोटो अथवा चित्रीकरण करावे, वाहनचालक वाहनात बसलेला असतानादेखील त्याच्यावर नो पार्किंगची दंड आकारणी केली जाते. नियमानुसार एखाद्या वाहनावर जर ५०० रुपये दंड आकारणी असेल तर मुद्दामपणे १,५०० किंवा त्यापेक्षा जास्त केली जाते. वाहनचालकाची चूक असल्यास त्याची शिक्षा किंवा दंड आकारणी अनेकदा वाहनाच्या मालकावर केली जाते. हे प्रकार लवकर थांबविण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे काळू थोरात, बादशहा शेख, कैलास वाघ, अश्फाक शेख, अमित फुंदे, कैलास घोरपडे, राहुल वाकेकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहरातील पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.