पंकज चव्हाण | दखल
अर्थ विभागाचा अधिकारी म्हटल्यावर आपल्या मनात त्या अधिकार्याविषयी जटिल प्रतिमा निर्माण होते. पण या पूर्वग्रहित प्रतिमेला हिंगाने अपवाद ठरतात. कारण त्यांचं असणारे अफाट अवांतर वाचन. मृदू भाषा, शांत मधाळ स्वभाव. वित्तीय क्षेत्राचा दांडगा अभ्यास, सामाजिक, राजकीय घडामोडींचं आकलन.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रगती इमारतीचा तळमजला म्हणजे जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी. हा अगदी छोटा भाग. दोन व्यक्ती जरी उभ्या राहिल्या तरी गर्दी वाटावी असा. पण शंभर कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याचं नियोजन इथूनच होतं. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत पाडल्यानंतर अर्थ विभाग या भागात वसला आहे. सध्या या विभागाचे कारभारी आहेत मयूर मल्लिकार्जुन हिंगाने. मुख्य लेखा व वित्त अधिकारी असं त्यांचं पदनाम. अर्थ विभागाचा अधिकारी म्हटल्यावर आपल्या मनात त्या अधिकार्याविषयी जटिल प्रतिमा निर्माण होते. पण या पूर्वग्रहित प्रतिमेला हिंगाने अपवाद ठरतात. कारण त्यांचं असणारे अफाट अवांतर वाचन. मृदू भाषा, शांत मधाळ स्वभाव. त्यांचा वित्तीय क्षेत्राचा अभ्यास दांडगा आहेच, शिवाय जगातल्या सामाजिक, राजकीय घडामोडींवर त्यांचं असणारं आकलन. भारताच्या इतिहासाचा त्यांचा असणारा अभ्यास, महत्त्वाचे म्हणजे भारतीय पुराणकथांवरील त्यांचा विशेष अभ्यास थक्क करणारा असाच आहे. सतत ज्ञानग्रहण करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण अधोरेखित करते.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. वित्त विभागातील महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील वर्ग एकची पोस्ट त्यांनी मिळवली. आजपर्यंतच्या अकरा वर्षांच्या सेवेत त्यांनी पोलिस कमिशनर कार्यालय बृहन्मुंबई, म्हाडा मुख्यालय आणि आता ठाणे जिल्हा परिषद येथे सेवा बजावत आहेत.हिंगाने हे बारामती-इंदापूर रस्त्यावरील निमगाव केतकी गावचे. खाण्याच्या पानांसाठी प्रसिद्ध असणारं हे गाव बाजारपेठेचे गाव आहे. गावातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे गावापासून साधारणपणे 15-20 किलोमीटर अंतरावरील श्री. वर्धमान विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी नियमित 20 किलोमीटर प्रवास करणे अवघड वाटत होते. परंतु आज मागे वळून पाहताना वडिलांनी तो घेतलेला निर्णय किती दूरदर्शी आणि निर्णायक होता याची कल्पना येते, अशी भावना हिंगाने व्यक्त करतात. वालचंदनगर या ठिकाणी तालुक्यातून अतिशय हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत व शाळा व्यवस्थापन गुणवत्ता इत्यादींबाबत दोन पावले पुढे असल्याने त्याचा शिक्षणावर नकळतपणेच अतिशय चांगला परिणाम झाल्याचेही हिंगाने सांगतात. शाळेमध्ये असताना प्रामुख्याने बी. एम. पाटील सर, साळुंखे सर, क्षीरसागर मॅडम, खोत सर, कुलकर्णी सर, नगरकर मॅडम इत्यादी शिक्षकांनी माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा उचलला असल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात.
नामांकित व गौरवशाली परंपरा लाभलेले पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी अकरावी व बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. तद्नंतर पुणे विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. एकूण पाच वर्षांचा कालखंड.
याच कॉलेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी केली. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळाल्याने खर्या अर्थाने तेथूनच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याचा प्रवास सुरू झाल्याचे ते सांगतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बर्याच वेळा परीक्षांची लांबलचक प्रक्रिया, त्यामध्ये असणारी जीवघेणी स्पर्धा व लागणारा अत्यल्प निकाल यामुळे कायमच एक मानसिक दडपण असते. पण सरतेशेवटी स्वतःवरील विश्वास व त्याला दिलेली सातत्यपूर्ण मेहनतीची प्रामाणिक जोड यामुळे त्यात यश मिळविणे शक्य होते. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच हिंगाने यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले. मुख्य म्हणजे शालेय जीवनापासून रोजच्या जगण्यात आजूबाजूच्या जगात राज्य-देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्या विविध घडामोडींकडे चौकस व चिकित्सक नजरेने पाहण्याची त्यांची सवय स्पर्धा परीक्षा देताना फायदेशीर ठरली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना आजही ते मार्गदर्शन करतात. ते सांगतात की, माझा काळ हा एक तपापूर्वीचा होता. आता स्पर्धा परीक्षेच्या रचनेत बरेच महत्त्वाचे बदल झाले आहेत. तरीही स्पर्धा परीक्षांचा ओढा कमी झालेला नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा इतर परीक्षांसारखा एका ठरावीक वेळेत आणि चौकटीत करता येणार नाही. आपण आपल्या शालेय, महाविद्यालयीन वर्षांत जो अभ्यास करतो, रोजच्या जगण्यात आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रांतील घडामोडींचा जेवढा चिकित्सक अभ्यास करतो या सगळ्यांचाच या अभ्यासात समावेश होतो. तरीही केवळ स्पर्धा परीक्षेचा म्हणून अभ्यास करताना सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम, त्या अनुषंगाने त्यासाठी लागणारी संदर्भ पुस्तकांची निवड व मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला तर त्याचा निश्चितच उपयोग होतो. यावरून परीक्षेसाठी काय पातळीची तयारी करणे अपेक्षित आहे याचा अंदाज येतो. शिवाय तयारी करताना त्यातील सातत्य व त्यासाठी घ्यावी लागणारी कठोर मेहनत याची तयारी करणे आवश्यक आहेफ.
कोणत्याही संस्थेची आर्थिक घडी सुस्थित बसवायची असेल तर वित्त विभागाचे आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे आणि मिळणार्या उत्पन्नातून उत्पन्न वाढविणे यासाठी प्रयत्न करणे ही अर्थ विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हिंगाने या कसोटीवर उजवे ठरतात. संस्थेचे वित्तीय व्यवस्थापन, वार्षिक बजेट, लेखे अद्ययावत ठेवणे इत्यादी स्वरूपाचे कामकाज ते नियोजनपूर्वक पार पाडतात. आर्थिक शिस्त हा कोणत्याही कार्यालय संस्थेच्या पाठीचा कणा असून, तो व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे काम करताना विविध विभागांकडून राबविण्यात येणार्या विकास योजना शासकीय नियमांच्या चौकटीत राहून कशाप्रकारे प्रत्यक्षात आणता येतील, यासाठी अत्यंत निर्णायक भूमिका ते बजावत आहेत.
हिंगाने म्हणतात, की आता मागे वळून पाहताना एक आव्हानात्मक परीक्षा पास झाल्याचा आनंद आहे. मागील साधारण अकरा वर्षांच्या कालावधीत पोलिस आयुक्त कार्यालय (बृहन्मुंबई), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (बांद्रा), जिल्हा परिषद (ठाणे) यांसारख्या कार्यालयांत काम करताना एका विशिष्ट भूमिकेतून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी योगदान देता येत आहे याचा आनंद आहे. पण याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर काम करण्याची इच्छा-योग्यता-गरज असताना एका साचेबद्ध कामाच्या स्वरूपामुळे ते करता येत नाही. यामुळे मन समाधानी नसले तरी ते करण्याची इच्छा प्रबळ असल्याने मन आशावादी व प्रसन्न असल्याचे ते म्हणाले.