दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळ कमी असल्याने नोकरदारवर्ग ऑनलाइन पद्धतीने जेवण मागवत असतो. आता भुकेल्या जिवांच्याही पोटात दोन घास पडावेत, या उद्देशाने ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी वाय बाईट्स हे अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून अन्नचळवळ सुरू करण्यात येणार आहे. या अॅपचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तथा भाजप आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अनिल भांगले हे गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. या संस्थेचा मुख्य उद्देश हा भुकेल्या पोटाला दोन घास मिळवून देणे हाच आहे. भंगाळ हे दररोज 200 जणांना जेवण पुरवत असतात. या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे आणि सर्वसामान्य नागरिकांचा चळवळीत सहभाग वाढावा, यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसह वाय बाईट्स नावाचे अॅप सुरू केले आहे. या अॅपशी ठाण्यातील 100 हॉटेल्सनी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपच्या माध्यमातून एका व्यक्तीने अन्न मागवल्यानंतर एका भुकेल्या माणसालाही अन्न देण्यात येणार आहे. त्याची माहितीही संबधित ऑर्डरकर्त्याला दिली जाणार आहे. हे अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.