दिनमान प्रतिनिधी
वसई|
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या समोर सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला असून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व विशेषता समुद्रकिनारी असणार्या अधिकारी वर्गाला सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
ओएनजीसी तेल विहिरी व वसई तालुक्यातील किनार्याच्या दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ३.८ रिचशर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. समुद्रामध्ये झालेल्या भूकंपामुळे वसई अथवा पालघर तालुक्यात कंप जाणवला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या भूकंपाच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधून सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भूकंपामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्री लाटांच्या तीव्रतेमध्ये बदल झाला नसल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिला आहे.