दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
एकीकडे पावसाची संततधार आणि दुसरीकडे ढोलताशाचा गजर, डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी अशा मंगलमय व जल्लोषपूर्ण वातावरणात ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई शहरांत लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. सोमवारी सायंकाळपासूनच बाप्पांच्या आगमनाने ठाणेकरांना आनंदाचे डोही आनंद तरंगची अनुभूती दिली. ठाणे शहरात सुमारे १ लाख ४६ हजार २५० बाप्पांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यामध्ये घरगुती १ लाख ४५ हजार १९८ तर सार्वजनिक मंडळांच्या १ हजार ५२ बाप्पांचे वाजत-गाजत आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष लहानथोरांसह प्रत्येकाला सुखावणारा ठरला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ६ हजार बाप्पांची शहरी भागात वाढ झाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे शहरासह उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या भागांत बाप्पांच्या आगमनाने घरोघरी, वस्त्यावस्त्यात उत्साह संचारला होता. यंदा कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी ठाण्यातून एसटी बसची मोफत सेवा शिवसेनेतर्फे पुरवण्यात आली होती. त्याचा लाभ गणेशभक्तांना झाला. कोकणाात गणेशोत्सवाठी जाणार्या भक्तांनी खासगी वाहने, ट्रॅव्हल्सच्या बसेस, एसटी मिळेल त्या वाहनाने कोकण गाठण्यासाठी लगबग केल्याने ठाणे शहर आणि परिसरातून जाणारे रस्ते, महामार्ग वाहनांच्या गर्दीने ब्लॉक झाले होते. ठाणे शहर आयुक्तालयाच्या पाच परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण १ लाख ४६ हजार २५० बाप्पांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी ठाणे शहर पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. आयुक्तालयासह पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एकूण साडेचार हजार अधिकारी, कर्मचार्यांचा फौजफाटा तैनात असेल. याशिवाय एसआरपीएफच्या ५ प्लाटून, एक कंपनी तसेच आरसीपीच्या दोन कंपन्या असतील. यामध्ये ४ अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह ८ पोलिस उपायुक्त, १७ साहाय्यक पोलिस आयुक्त, ११९ पोलिस निरीक्षक, ३०२ साहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ३ हजार २९५ पोलिस कर्मचारी, २५० प्रशिक्षणार्थी कर्मचारी, १५ प्रशिक्षणार्थी साहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ७०० होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.
उल्हासनगर परिमंडळात सर्वाधिक बाप्पा
उल्हासनगर शहरासह अंबरनाथ, बदलापूर या परिसरात सर्वाधिक सार्वजनिक आणि घरगुती श्रींचे आगमन होणार आहे. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवलीत बाप्पा भक्तांच्या घरी मुक्कामी येणार आहेत. उल्हासनगरात सार्वजनिक २९४ तर घरगुती ४७ हजार १२९ बाप्पांचे आगमन होणार आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी १४ हजार ८४५ माहेरवशीण गौराईंचे आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक उल्हासनगर परिमंडळामध्ये ६ हजार १०७, त्याखालोखाल कल्याण- ४ हजार ४४६, वागळे इस्टेट – १ हजार ९९३, ठाणे शहर- १ हजार ७२६ आणि भिवंडीत ५७३ गौराईंचा समावेश आहे.
शहर पोलिस आयुक्तालयातील बाप्पा
परिमंडळ सार्वजनिक घरगुती
ठाणे शहर १३३ १४,९०७
भिवंडी १५३ १०,६६२
कल्याण २९४ ४७,१२९
उल्हासनगर २६७ ४५,६५१
वागळे इस्टेट २०५ २३,८४९
एकूण १,०५२ १,४५,१९८