राम जगताप | तर्काचा घोडा
‘मुक्त-शब्द’चा जून 2021चा अंक उघडला आणि एकदम आश्चर्याचा धक्काच बसला! अनुक्रमणिकेत चक्क मेघना पेठे यांचं नाव. ‘तुकडे’ असं शीर्षक. ते वाचून क्षणभर ‘युरेका, युरेका!’ असं म्हणावसं वाटलं! घाईगडबडीनं बायकोला बोलावून सांगितलं, ‘अगं, बघ मेघना पेठे यांनी खूप वर्षांनी काहीतरी लिहिलंय.’ (पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात तिला त्यांची ‘नातिचरामि’ ही कादंबरी होती आणि तेव्हा ती तिला आवडलीही होती.)
मीही अंक उघडून काय लिहिलंय ते पाहिलं. तर दोन पानी कविता. सुरुवातीला वाटलं कवितेसारखं मुक्तचिंतन लिहिलंय की काय! पण वाचल्यावर जाणवले ही कविता आहे.
‘नातिचरामि’नंतर मेघना पेठे यांनी जवळजवळ काहीच लिहिलेलं नाही, त्यांचं एकही नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. (इतर कुणी असतं तर एव्हाना त्याची आठ-दहा पुस्तकं आली असती!) ‘नातिचरामि’ ही त्यांची पहिलीवहिली कादंबरी प्रकाशित झाली 2005मध्ये. ‘आंधळ्याच्या गायी’, ‘हंस अकेला’ या आधीच्या दोन लक्षणीय, वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रहांमुळे ही कादंबरी तेव्हा बरीच चर्चित ठरली होती. त्या वेळी तिच्यावर बरीच भवती न भवती, चर्चा, टीकाही झाली. पण तरीही पुढच्या तीन-चार वर्षांत मेघना पेठे नवी दमदार कादंबरी घेऊन येतील, असं वाटलं होतं. मात्र तसं काहीच घडलं नाही. मध्यंतरी त्यांनी ‘मुक्त-शब्द’च्या दोन दिवाळी अंकांचं ‘अतिथी संपादक’ म्हणून काम केलं. पण तेवढंच. क्वचित त्यांनी लिहिलंही असेल, पण त्याची संख्या फारशी नसावी.
त्यामुळे असं वाटतं होतं की, 16 वर्षं होत आली, आता तरी मेघना पेठे यांचा नवा कथासंग्रह किंवा कादंबरी यायली हवी. त्यांचे दोन कथासंग्रह मला तसे आवडलेले, पण कादंबरी फारशी आवडली नव्हती. तरीही मी त्यांच्या पुढच्या लेखनाची वाट पाहतो आहे. चांगल्या लेखकाकडून आपल्या जरा जास्तच अपेक्षा असतात!
आणि अगदी उलट घडलं, असं म्हणायला हवं. ‘तुकडे’ ही कविता वाचून विरस झाला. एकतर तिच्यात ‘कवितापण’ म्हणावं, असं विशेष काही सापडत नाही. फक्त आवर्तात सापडलेली काहीशी एकेरी वेदना आहे. त्यामुळे ती फक्त व्यक्तिगत पातळीवर राहते. वाचणार्याच्या संवेदनविश्वाचा भाग होण्यासाठी आवश्यक व्यक्तिनिरपेक्षतेचा अंश तिच्यात नाही. त्यामुळे कविता म्हणून ती फारशी बरी नाही. भावुक, भाबडी असेच तिचं वर्णन करावं लागेल.
‘नातिचरामि’ ही मीरा या नायिकेची कहाणी. ती घटस्फोटित. नवर्याचा वाईट अनुभव आल्याने तमाम पुरुषांतल्या केवळ ‘पुरुषी मनोवृत्ती’चाच मागोवा घेणारी. कुटुंबसंस्थेतल्या पुरुषी वर्चस्वाला झुगारून देत स्वतंत्रपणे जगू पाहणारी नायिका मेघना पेठे यांनी या कादंबरीतून रेखाटली खरी, पण तिच्या वैचारिक विकासाचा, सामर्थ्याचा किंवा निव्वळ माणूस म्हणून झालेल्या प्रगल्भ वाढीचा आलेख काही त्यांनी दाखवला नाही. त्रागा, चिडचिड आणि करवादत राहणं एवढाच एककलमी कार्यक्रम या कादंबरीत दिसतो. म्हणूनच कदाचित तिला रूढ कादंबरीचा फॉर्म नाही. कारण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आत एक समाज, त्या समाजाची लोकशाही निर्माण करावी लागते. एका अख्ख्या समाजाचं जगणं मानसिक पातळीवर जगावं लागतं. त्यातल्या प्रत्येकाचे स्वतंत्र जगणंही निर्ममपणे समजून घ्यावं लागतं.
मॅनेजर पाण्डेय या हिंदी समीक्षकाचा ‘उपन्यास और लोकतन्त्र’ या नावाचा एक फार सुंदर निबंध आहे. (कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी त्याचा ‘कादंबरी आणि लोकशाही’ या नावानं मराठी अनुवादही केला आहे. लोकवाङ्मयगृहाने ही पुस्तिका जून 2011मध्ये प्रकाशित केलीय.)
असो.
बंडखोरी करणं म्हणजे केवळ आपल्याला नापसंत असलेल्या गोष्टींविषयी ब्र उच्चारणं, अशी काहींची सरधोपट व्याख्या वा समज असतो. भारतीय कुटुंबसंस्था, त्यात पुरुषांचं प्राधान्य याविषयी परस्पर विरोधी मतं, अनुभव असणारच, असायलाही हवेत. त्यामुळे त्याविषयी स्पष्टपणे बोलायला काहीच हरकत नाही. ‘नातिचरामि’तली मीरा धीटपणे ते करते.
खरं शहाणपण प्रश्न विचारण्यात, ते उपस्थित करण्यातच असतं. साहित्याने मग ते कथा, कादंबरी वा कविता काहीही असो, प्रश्न तर उपस्थित करायचेच असतात; पण वाचकांसोबत उत्तरं शोधायचाही प्रयत्न करायचा असतो. मात्र वैयक्तिक निष्कर्ष अंतिम नसतात आणि अशा निष्कर्षांचे सामाजिक सिद्धान्तही होत नाहीत. त्यामुळे हा प्रकार काहीसा चक्रव्यूहासारखा होतो. आत शिरता तर येतं, पण बाहेर येण्याचा रस्ता स्वत:ला पणाला लावूनच शोधावा लागतो.
‘तुकडे’ या कवितेत नेमकं तेच दिसत नाही. म्हणून ती ‘नातिचरामि’तल्या मीराचा उत्तरार्ध तर नाही ना, असं वाटायला लागतं.
खरंतर या कवितेला ‘खंत-सुक्त’ म्हणायला हवं. शहरी मध्यमवर्गीय लोकांचं एक नामी वैशिष्ट्य असतं. त्यांना स्वातंत्र्य तर हवं असतं, पण स्वत:पुरतं. बंडखोरी करायची असते, पण तीही केवळ कशाला तरी केवळ नकार द्यायचा असतो म्हणून. त्यांना ब्र उच्चारायचा असतो, पण तो नेमका कशाविषयी उच्चारायचे याची त्यांच्याकडची यादी तशी सामान्यच असते बहुतेकदा. कारण व्यक्तिवाद (म्हणजे माझी निवड, हेच माझं स्वातंत्र्य!) हेच त्यांच्या दृष्टीनं श्रेष्ठ मूल्य असतं. व्यक्तीवादाच्या जपमाळेनं आपलं बरंच नुकसान झालंय, हे ज्यांना कळतं पण वळत नाही आणि तरीही ज्यांची स्थितीशीलता ढळत नाही, अशा सुखासीन मध्यमवर्गीयांची उतारवयात शोकांतिका होत जाते.
‘तुकडे’ या कवितेकडे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहता येईल. या कवितेतील खंत-आळवणी तशी सामान्यच आहे. तिचा शेवट मात्र थोडासा धक्का देतो. कारण त्यात या म्हातार्या जहाजावर आपण एकटेच उरणार की काय, ही भावना ओतप्रोत भरलीय. म्हणजे हे निवेदन मनानं तरुण असलेल्या पण उतारवयात पोहोचलेल्या स्त्रीचं आहे.
आपण आपली स्वतंत्र शिडाची होडी एकदा पाण्यात लोटली की, ती आपल्याला हाकारत हाकारत पैलतीराला न्यावी लागते. होडी पाण्यातल्या लाटांनुसार हाकारावी लागते, आपल्या मनातल्या भावनिक आंदोलनानुसार हाकारून चालत नाही! त्यातही आपण आपली होडी जाणीवपूर्वक सोसाट्याचा वारा असतानाच पाण्यात लोटली असेल तर आपला पल्ला बाक्या प्रसंगांशीच पडतो. त्यातून होडीला पैलतीरापर्यंत नेता येते. त्यासाठी जिद्द लागते, व्यावहारिक शहाणपण लागते; सामंजस्य, सहनशीलताही लागते. पण यातलं काहीच नसलेल्याच्या वाट्याला काय येतं, त्याचा निर्देश ही कविता शेवटी करते.
होडीत आपण एकटे असो वा इतरही कुणी असो, जगण्याचा स्वीकार आवश्यक असतो आणि ज्यांना जगत राहायचं असतं त्यांच्यासाठी अपरिहार्यसुद्धा. एकटं जगण्यात, ते जगताना यातना होण्यात, त्याच्या व्यक्ततेत असाहजिक असं काहीच नसतं. पण याच्या जोडीला आपलं जगणं आपणच निवडलं असल्याची शुद्ध व क्रूर जाणीव आणि आपल्या ससेहोलपटीसकट आपण जिवंत असल्याच्या विधायक स्वीकाराचं भान सोडून चालत नाही. मात्र ते भान सुटतं, तिथं व्यक्त होणं काहीसं आवाजी, भावबंबाळ आणि खंतयुक्त व्हायला लागतं, अशी भावना ही कविता वाचताना होत राहते.
जगण्याचा स्वीकार करायचा नाहीये. भरभरून प्रेम करायचंय, मात्र स्वत:तलंच काहीतरी आड येतंय. डाव उधळताही येत नाहीये आणि मांडताही येत नाहीये, असा जांगडगुत्ता झाल्यावर काय करायचं? ‘नातिचरामि’ची नायिका मीराला तिचा मित्र एकदा म्हणतो, ‘सगळं कळतं माझ्या बाईला, पण तरीही घर गळतं.’ ‘तुकडे’ ही कविता या मीराचीच असावी असं वाटतं, ते त्यामुळेच!
‘नातिचरामि’ हा मूळ शब्द ‘धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि’ या मूळ संस्कृत वाक्यातला आहे. हिंदू धर्मात विवाहाच्या वेळी नवर्यानं बायकोला द्यावयाचं हे वचन आहे. त्याचा अर्थ आहे – धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषांर्थांबाबत मी अतिचार करणार नाही, मर्यादातिक्रम करणार नाही. पण कुठलीही वचनं (किंवा सुविचार किंवा सुभाषितं) आदर्शांसारखी, आणि आदर्श नेहमीच क्षितिजासारखे असतात. तुम्ही जेवढे त्यांच्या मागे जाता तेवढी तुमची फरपट होते.
म्हणून तर बहुतेकांचा योगक्षेम त्यांच्याशिवायच चालत असतो. आणि तरीही ती आपापल्या जागी यथार्थपणे जगतही असतात. विचार नावाचा किडा त्यांना चावायला जात नाही. पश्चात्ताप नावाची बाधा त्यांना होत नाही. ती नदीच्या प्रवाहासारखी वाहत असतात. त्यामुळे बहुधा आजच्या माणसाला विज्ञानाच्या भाषेत ‘होमो सेपियन्स’ (शहाणा माणूस) म्हणतात, ‘आदर्श माणूस’ म्हणत नाहीत! कारण ‘आदर्श माणूस’ ही फॅण्टसी असते.
हो, पण ठरवलंच तर जगणं फॅण्टसीमय करता येतं किंवा फॅण्टशीतही जगता येतं. मात्र अशा जगण्यात आणि डिस्नेलॅण्डची सफर करण्यात फरक असतो. प्रेक्षणीयता, आकर्षकता आणि लोभसपणा ही फक्त रमणीय जगाचीच वैशिष्ट्यं असतात.
आपल्या टर्म अँड कंडिशनवर जगण्याचा कभिन्नकाळा खडक फोडत निघालेल्यांनी डेड एण्डची फिकीर करायची गरज नसते. कारण एकदा टिपिकल जगण्याला नकार दिल्यानंतर निवडलेलं जगणं शिंगावर घेण्याशिवाय पर्याय नसतो. सगळे दोर कापून टाकणं ही जणू अशा जगण्याची अपरिहार्यताच असते. मात्र ही अपरिहार्यता कापलेल्या दोरांच्या जखमा करून घेऊन त्यातच वाहून जात असेल, तर मग दोर कापण्याची निरर्थकता सिद्ध होते. अर्थात हीही निवड असूच शकते; पण मग तिला संकुचितपणाचा शाप लागल्याशिवाय राहत नाही. आणि अंतिमतः ज्या तत्त्वांपोटी दोर कापले जातात त्यांच्या बरोबर विरुद्ध टोकावर येऊन दोर कापणारा उभा असल्याचे त्याच्या व्यक्ततेतून जाणवतं, लख्ख होत राहतं.
‘नातिचरामि’तल्या आणि ‘तुकडे’तल्या मीराचं नेमकं तसंच झाल्यासारखं वाटतं.
आपण आपल्या हातांनी आपल्यासाठी जे जग बनवू इच्छितो, त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो.
अशा संघर्षातलं ऐश्वर्य मुक्कामापर्यंत पोहोचण्यात नसतं, ते खर्या अर्थानं त्याच्या प्रवासातच असतं!
jagtap.ram@gmail.com
मेघना पेठे यांनी लेखन बंद करू नये खरे तर. मी त्यांची नातिचरामि कादंबरी महत्प्रयासाने वाचली. अनेक प्रयत्न करून वाचली. मी तसा खूप संयमाने रटाळ पुस्तके पण वाचणारा. पण नातिचरामि सारखी सहनशीलतेचा अंत बघणारी कादंबरी आयुष्यात वाचली नाही. मूळ गाभा एवढा सशक्त असूनही काहीतरी वेगळे करण्याच्या नादात लेखिका पूर्ण भरकटली. आणि परिणामी नातिचरामि च्या दर्जावर झाला. असे माझे स्पष्ट मत आहे. किरण नगरकर यांनी सात सक्कं त्रेचाळीस जेवढी विस्फोटक होती त्या वाटेने जायच्या नादात पुस्तक पूर्ण भरकटले. लेखिकेने यातून बोध घेऊन अधिक जोमाने लेखन करायला हवे होते. पण तसे काही झालेले दिसले नाही.