दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
कोरोनाकाळात जवळपास ठप्प झालेली तसेच गेल्या आठ वर्षांपासून ठेकेदार मिळत नसल्याने ठाणे महापालिका परिवहन सेवा अर्थात टीएमटी बसवरील जाहिरात योजना कागदावर होती. या योजनेसाठी आता ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्याने ती मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या योजनेत ३१० बसगाड्यांवरील जाहिरातीतून टीएमटीला पुढील पाच वर्षे सुमारे १२ कोटींचा महसूल मिळणार आहे.
कोरोनाकाळात बस गाड्यांवरील जाहिरातीतून टीएमटीला मिळणारे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपयांवर आले होते. त्यात आता चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा टीएमटी प्रशासनाला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशांनुसार तसेच ठाणे महापालिका परिवहन समितीच्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात टीएमटीच्या ताफ्यातील १५ वातानुकूलित बसगाड्या, ११० स्टँडर्ड बसगाड्या, ९० मिडी बसगाड्या, जेएनयूआरएमममधील नवीन आणि जुन्या ४५ बसगाड्या, ५० तेजस्विनी बसगाड्या अशा एकूण ३१० बस गाड्यांवर भाडेतत्त्वाने पाच वर्षांसाठी जाहिराती देता येणार आहेत. नवीन निविदेत जाहिरातींसाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी भाडेदरात ५ टक्के वाढ होणार आहे. कंत्राटदाराला एक महिना कालावधीचे आगाऊ जाहिरात भाडे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करावे लागणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सरासरी प्रति बस प्रति महा ५,७७६ रुपये दर मिळणार आहे. त्यात दरवर्षी पाच टक्के वाढ होऊन पाच वर्षांत टीएमटीला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
बसगाड्यांवरील जाहिरात हक्कांसाठी यापूर्वी २०१० ते २०१३ आणि २०१३ ते २०१६ अशा काळासाठी जाहिरात निविदा काढण्यात आल्या होत्या. टीएमटीने २०१६मध्ये जाहिरातींची निविदा काढली होती. ती निविदा मुदतवाढ देऊन २०२१ पर्यंत सुरू होती. २०१६ ते २०२३ या काळात १० वेळा निविदा काढण्यात आल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. २०२१ ते २०२३ या काळात कोरोनामुळे जाहिरातींची प्रक्रिया ठप्प होती.