फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपती 115.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे, तर बिल गेट्स यांची संपत्ती 104.6 अब्ज डॉलर आहे. या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी दहाव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर्स आहे. तर टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे 235.8 अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स 600 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एकचतुर्थांश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे. दरम्यान, अदानी एंटरप्राइझ लिमिटेडने 26 जुलै रोजी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे.