दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील फूल मार्केटमधील शेड तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार गुरुवारी पोलिस बंदोबस्तात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेड पाडण्याची कारवाई केली. या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात एपीमसीने कारवाई केली आहे.
फूल मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या पुनर्विकासाला काही फूल विक्रेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश एपीएमसीला दिले होते. सात दिवसांत ही कारवाई करा, असे आदेश होते. 15 सप्टेंबर रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर एपीएमसी प्रशासनाकडून त्याठिकाणी विक्रेत्यांना नोटिसा बजावून कारवाई केली जाईल, असे सूचित केले होते. या कारवाईकरीता पथक पोहोचले असता त्याला फूल विक्रेत्यांनी विरोध केला. काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.