प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी पुरेशी वीजनिर्मिती करत असताना विजेची उच्चांकी मागणी पूर्ण करण्यासाठी ऊर्जा विभागाची महानिर्मिती महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
महानिर्मिती कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५४,४७७ द.ल.यु. इतकी वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. यापूर्वी, महानिर्मिती कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ५३,१०५ द.ल.यु. इतकी उच्चांकीय वीजनिर्मिती केली होती. तसेच, महानिर्मितीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये औष्णिक स्रोताद्वारे ४७,६३६ द. ल. यु. इतकी वीजनिर्मिती करून ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. यापूर्वी, महानिर्मिती कंपनीने आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ४६,१३५ द.ल.यु. औष्णिक वीजनिर्मिती केली होती. अनेक लघु जलविद्युत केंद्रांनी देखील विक्रमी कामगिरी नोंदविली आहे.
महानिर्मितीच्या अनेक औष्णिक विद्युत केंद्रांच्या कामगिरीत या वर्षी सातत्याने सुधारणा होऊन वाढीव भारांक, उपलब्धता, इंधनतेलाचा कमी वापर याद्वारे एकूण कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. प्रभावी इंधन व्यवस्थापन, सामुग्रीसाठयाचे नियोजन, कोळसा अदलाबदलीच्या धोरणाची (Coal Swapping) अमलबजावणी, वित्तीय कर्जाची पुनर्बांधणी इ. प्रभावी उपाययोजनांमुळे वीजनिर्मिती खर्च नियंत्रित करून त्याचा अंतिम फायदा ग्राहकांना देण्यात महानिर्मितीला यश मिळत आहे.
इंधन व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र सुधारणा राबवून, कोळशाची योग्य ग्रेडिंग पद्धत राबविल्याने व कोळसा वाहतुकीतील transit losses व डीमरेज चार्जेस खूप मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आल्याने महानिर्मितीला मोठी आर्थिक बचत करण्यात यश आले आहे.
राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची असणारी अभिनव अशी ‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना’ राबवत असताना महानिर्मितीने २०७ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केले आहेत. महानिर्मितीने आगामी काळामध्ये एकूण २,७६३ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. एकूण २,५०० मेगावॉट क्षमतेच्या अल्ट्रा मेगा सौर पार्कसाठी महानिर्मिती व एन.टी.पी.सी. यांची संयुक्त कंपनी स्थापण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून यातील महानिर्मितीचा वाटा १,२५० मेगावॅट इतका असणार आहे. तसेच, महानिर्मितीच्या दोंडाईचा, जि. धुळे येथील एकाच ठिकाणी उभारण्यात येत असलेला राज्यातील सर्वात जास्त क्षमतेचा (२५० मेगावॉट) सौर प्रकल्पासाठीचा वीज खरेदी करार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी मे. टाटा पॉवर सौर लिमिटेड यांच्यासोबत संपन्न झाला. तसेच, चंद्रपूर येथे इरई धरणावर १०५ मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या (MNRE) धोरणाच्या UMREPP योजने अंतर्गत प्रस्तावित आहे. तसेच कौडगांव, जि. उस्मानाबाद येथील ५० मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे.
भेल या सरकारी कंपनीमार्फत भुसावळ येथील ६६० मेगावॉट क्षमतेच्या सुपरक्रिटिकल संचाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून सदर प्रकल्प या वर्षभरात कार्यान्वित होणार आहे. सुपरक्रिटीकल तंत्रज्ञानामुळे संचाची कार्यक्षमता वाढून तुलनेमध्ये वीजनिर्मितीसाठी कमी कोळसा लागणार असून विजेचा अस्थिर आकार कमी होणार असल्याने त्याचा लाभ महाराष्ट्रातील वीजग्राहकांना होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणास घातक वायूंची उत्सर्जन पातळी कमी होण्यास मदत होऊन पर्यावरणाचा समतोल साधण्यासही मदत होणार आहे.
महानिर्मिती कंपनीने कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे २ x ६६० मेगावॉट क्षमतेचा औष्णिक प्रकल्प प्रस्तावित केला आहे. सदर प्रकल्प उभारण्यास महाराष्ट्र शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सुधारित पर्यावरण विषयक मानकांना अनुसरून महानिर्मितीच्या कोळशावर आधारित नवीन औष्णिक प्रकल्पांसाठी पर्यावरण पूरक अशी FGD, SCR इत्यादि संयंत्रे प्रस्तावित केली आहेत. महानिर्मितीच्या सद्यस्थितीत चालू असलेल्या कोळशावर आधारित विविध औष्णिक वीज संचांसाठी देखील टप्प्याटप्प्याने FGD संयंत्र उभारण्यात येणार आहे.
महानिर्मिती कंपनीने पाईप कन्व्हेयर हे अद्ययावत, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरून भटाडी कोळसा खाणीतून चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी, तसेच खापरखेडा व गोंदेगाव, भानेगाव, सिंगोरी या कोळसा खाणीतून कोराडी व खापरखेडा औ. वि. केंद्रांसाठी कोळसा वहनासाठी प्रकल्प हाती घेतलेले आहेत. गोंडेगाव, भानेगाव, सिंगोरी या कोळसा खाणीतून कोराडी व खापरखेडा औ.वि. केंद्रांसाठी पाईप कन्व्हेयरद्वारे कोळसा वहनासाठीच्या योजनेचे काम प्रगतीपथावर असून जुलै २०२३ मध्ये कार्यान्वयन अपेक्षित आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खाणीच्या परिसरात मोठया प्रमाणातील रस्ते वाहतुकीने होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणात लक्षणीय घट होईल, संभाव्य वाहन अपघातास प्रतिबंध बसेल व रेल्वे व रस्ते वाहतुकीदरम्यान होणाऱ्या कोळशाचे नुकसान कमी होऊन महानिर्मितीस कमी खर्चात कोळशाचा खात्रीशीर पुरवठा होऊ शकेल.
महानिर्मितीने एस.सी.सी.एल. सोबत पुढील ३ वर्ष ६ एम. एम. टी. कोळसा पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्याचबरोबर CEA च्या मार्गदर्शक तत्वानुसार महानिर्मितीने कोळशासह को फायरिंगसाठी दरवर्षी एकूण वापराच्या ७% बायोमास पेलेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वित्तीय कर्जाची पुनर्बांधणी व अन्य वित्तीय सुधारणात्मक उपाययोजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महानिर्मितीच्या खर्चात लक्षणीत बचत झाली असून वार्षिक व्याज खर्चात सुमारे ३८७ कोटी रुपये इतकी बचत झाली आहे. त्याचा अंतिम फायदा वीज ग्राहकांना मिळत आहे.
कोळसा ज्वलनानंतर तयार होणाया फ्लाय अॅशच्या १००% पुनर्वापरासाठी महानिर्मितीद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. इच्छुक उद्योगसंस्थांना महानिर्मितीतर्फे जवळपास मोफत वा अगदीच नगण्य दरात सायलोच्या माध्यमातून ही राख उपलब्ध करून दिली जाते. कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे सिमेंट प्लांट / सिमेंट प्लांटचे अत्याधुनिक युनिट स्थापित करण्याचा महानिर्मितीचा मानस असून पारंपरिक वीटभट्टी धारकांसाठी परिसरात फ्लाय अॅश ब्रिक्स क्लस्टर उभारणीबाबतही कार्यवाही सुरू आहे.