दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे रेल्वे तिकीट खिडकीजवळून अपहरण झाले. या मुलीचा कल्याण रेल्वे स्थानक परिसर, नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती आढळून आली नाही. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या दरम्यान एक प्रवासी आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह बाहेरगावी जाण्यासाठी निघाला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी जाण्यापूर्वी प्रवाशाने त्याच्या मुलीला पिशवीजवळ उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर तो तिकीट काढण्यासाठी गेला. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे त्यांना परत येण्यास उशीर झाला. तिकीट काढून आल्यानंतर मुलीच्या वडिलांना सामानाच्या पिशव्यांजवळ मुलगी आढळून आली नाही.