कल्याण।
मोहने आंबिवली पूर्व (ता. कल्याण) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रा. आरती चौधरी यांची खेलो इंडिया 2022-23 मध्य प्रदेश या स्पर्धेसाठी गतका खेळाचा महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. खेलो इंडिया ही स्पर्धा 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान मध्य प्रदेश येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे सराव शिबीर बालेवाडी, पुणे येथे 20 जानेवारीपासून सुरू आहे. प्रा. आरती चौधरी या गतका खेळ वाढवण्यासाठी गेली पाच वर्षे मेहनत करीत आहेत. त्याचे फलस्वरूप खेलो इंडियासारख्या मोठ्या स्तरावर महाराष्ट्राचा गतका खेळाचा संघ सहभागी होत आहे. प्रा. आरती चौधरी ह्या जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित पोई, खर्डी या महाविद्यालयात फिजिकल डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अभिनेत्री अश्विनी महागडे, खजिनदार अॅड. सायली जाधव, सदस्य निवृत्त आर्मी ऑफिसर रवींद्र चौधरी, अॅड. मृण्मयी जाधव आणि योगगुरू अविनाश अनपट यांनी प्राध्यापक आरती चौधरी यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.