दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
धुळ्याहून मुंब्रा येथे सैन्य दलाच्या परीक्षेसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणाचा फलाटावरच लोकलची जोरदार धडक लागून जागीच मृत्यू झाला. रामेश्वर भारत देवरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंब्रा शहरात एम एम व्हॅली परिसरातील मौलाना अब्दुल कलम आझाद क्रिडाप्रेक्षागृह येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत अग्निवीर भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी धुळ्याहून रामेश्वर देवरे हा तरुण आला होता. मृत रामेश्वर हा धुळ्यात कुटुंबासह राहत होता.
तो मुंब्रा स्थनाकात 21 सप्टेंबर रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आला असता, त्याला उलट्या झाल्यासारखे वाटल्याने तो मुंब्रा स्थानकातील 3 नंबर फलाटजवळ बसला. त्याच सुमारास एक भरधाव लोकल याच फटलावर येत होती. मात्र त्याला दिसली नाही आणि त्याचा लोकलची जोरदार धडक बसल्याने तो फलाटावरच हवेत उडून 10 ते 15 फूट फेकला गेला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याला येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. त्यांचे पार्थिव धुळे येथे पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.