श्रीकांत कुलकर्णी | जेष्ठ पत्रकार – चित्रपटविषयक अभ्यासक | ओळखीचे चेहरे
सुनील गोडबोले यांना लहानपणापासून अभिनय कलेची आवड होती त्यामुळे शाळकरी वयात त्यांनी बालनाट्यात कामेही केली होती. पुण्यात आल्यानंतर त्यांनी ’भरत नाट्य मंदिर’, ’सानुली रंगभूमी’ या संस्थेच्या माध्यमातून तसेच कृष्णदेव मुळगुंद, बाबुराव विजापुरे, दत्ता पुराणिक, आदी दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बालनाट्यात कामे केली. त्यानंतर त्यांनी ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेतर्फे दर महिन्याला होणार्या एकांकिकांमधूनही वेगवेगळ्या भूमिका केल्या.
मध्यंतरी दूरचित्रवाणीवरील ‘का रे दुरावा?’ या मालिकेतील नवरे नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मालिकेत दाखविलेल्या पर्यटन कंपनीत मुख्य व्यवस्थापक पदावर असलेले हे नवरे आपल्या कंपनीतील कर्मचार्यांना ‘गप्पा कसल्या मारता. चला कामाला लागा, कामाला’ असे म्हणत सतत टोकत असतात. त्या वेळी त्यांचे चेहर्यावरचे विशिष्ट हावभाव आणि टोकण्याची स्टाईल यामुळे हे नवरे प्रामुख्याने त्या कंपनीत काम करणार्या बायकांच्या (महिला कलाकारांच्या) जसे कायम लक्षात राहिले तसेच ही मालिका पाहणार्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. हे नवरे म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले. सध्या त्यांची ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील नानूमामाची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या मनात चांगली ठसली आहे.
सुरुवातीला नाटक, नंतर मालिका आणि त्यानंतर अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत काम करून आपली अभिनयकला जोपासणारे अभिनेते सुनील लक्ष्मण गोडबोले हे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक सर्व परिचित व्यक्तिमत्त्व. सुनील गोडबोले हे जन्माने तसे मुंबईकर. माटुंग्यात ते लहानाचे मोठे झाले. माटुंग्यातील लोकमान्य विद्यामंदिरात त्यांचे शालेय शिक्षण झाले. मात्र एलआयसीमध्ये नोकरीला असलेल्या वडिलांची मुंबईहून पुण्यास बदली झाली आणि सुनील गोडबोले पुण्यात आले आणि कायमचे पुणेकर झाले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
सुनील गोडबोले यांना लहानपणापासून अभिनयकलेची आवड होती. त्यामुळे शाळकरी वयात त्यांनी बालनाट्यात कामेही केली होती. पुण्यात आल्यानंतर त्यांनी भरत नाट्य मंदिर, सानुली रंगभूमी या संस्थांच्या माध्यमातून तसेच कृष्णदेव मुळगुंद, बाबुराव विजापुरे, दत्ता पुराणिक, आदी दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बालनाट्यांत कामे केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे दर महिन्याला होणार्या एकांकिकांमधूनही वेगवेगळ्या भूमिका केल्या. तसेच राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेताना ‘बकुळा’ या नाटकात काम केले. ‘दिवा जळू दे सारी रात’ हे त्या काळी प्रचंड गाजलेले नाटक हे सुनील गोडबोले यांचे पहिले व्यावसायिक नाटक. प्रकाश इनामदार यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यामध्ये त्यांनी नायिकेच्या (इंदुमती पैंगणकर) वडिलांचे काम केले होते. त्यानंतर प्रकाश इनामदार यांच्याबरोबरच त्यांनी ‘गाढवाचं लग्न’ या नाटकात ‘दिवाणजी’ची भूमिका केली. या नाटकाचे त्या वेळी तब्बल अडीच हजार प्रयोग झाले. त्यापैकी सुमारे दोन हजार प्रयोगांत सुनील गोडबोले दिवाणजी होते. त्याच वेळेला त्यांना प्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांच्याबरोबर ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या त्या काळच्या गाजलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकात सुनील गोडबोले यांनी मांडलेकर आणि सदाशिव पोळ अशा दोन्ही भूमिका केल्या. तर राजा गोसावी यांच्या निधनानंतर त्याच नाटकात त्यांनी राजाभाऊंची प्रमुख भूमिका केली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याबरोबर ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या नाटकातही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुनील गोडबोले यांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात ‘घाशीराम’ सोडून नाना फडणवीस, सूत्रधार आदी महत्त्वाच्या भूमिकाही केल्या. ‘घाशीराम’मध्ये ते इतके रंगले होते की त्यांना ‘घाशीराम’ नाटक तोंडपाठ झाले होते. मधल्या काळात त्यांनी कमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अंधायुग’ आणि ‘संगीत मत्स्यगंधा’ ही दोन हिंदी नाटकेही केली. या नाटकाच्या निमित्ताने त्यांना भारतभ्रमण करण्याची संधी मिळाली.
नाटकांमुळे पुण्यातील प्रसिद्ध अभिनेते शरद तळवलकर यांचा आणि सुनील गोडबोले यांचा चांगला परिचय झाला होता. त्यांच्यामुळेच सुनील गोडबोले यांचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. ‘आम्ही दोघं राजा राणी’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. मात्र त्यातील त्यांची भूमिका फारच छोटी होती म्हणजे फक्त पडद्यावर दिसण्यापुरतीच होती. मात्र त्यानंतर ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटात मात्र त्यांना चांगली भूमिका मिळाली आणि अशोक सराफ, सुधीर दळवी, अर्चना पाटकर या त्या काळच्या नामवंत कलाकारांबरोबर ते पडद्यावर झळकले.
त्या काळी फक्त सह्याद्री मालिकेवरच मराठी मालिका चालू होत्या. तेथेही सुनील गोडबोले यांना संधी मिळाली. दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘एक चिरंतन ज्योती’ या मालिकेमध्ये प्रथम त्यांना काम मिळाले. त्यानंतर ‘कल्याणी’, ‘मर्मबंध’ या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या. दूरचित्रवाणीवर अन्य मराठी वाहिन्या सुरू होताच त्यातील मालिकांमध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. नितीन देसाई यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या मालिकेत सुनील गोडबोले यांनी ‘नारोअप्पा’ केला. ती भूमिका नकारात्मक होती, मात्र ती चांगली वठविल्यामुळे त्यांना पुढे नकारात्मक व्यक्तिरेखाही मिळत गेल्या. ‘नूपुर’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘वहिनीसाहेब’, ’भाग्यलक्ष्मी’, ‘चार दिवस सासूचे’ आदी मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका केल्या. ‘दुनियादारी’ या सतीश राजवाडे यांच्या मालिकेत तर त्यांना जी अण्णा भाटे यांची भूमिकेत मिळाली होती. तीच भूमिका त्यांनी संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटातही केली. हा एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. अलीकडच्या काळात ‘का रे दुरावा?’ मालिकेमधील त्यांची नवरे ही व्यक्तिरेखा खूप गाजली.
सुनील गोडबोले सध्याच्या काळात खूप बिझी कलाकार आहेत. मधल्या काळात त्यांनी ‘पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर’, ‘मन्या सज्जना,’ ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा,’ ‘करायला गेलो एक,’ ‘डॅम्बीस’ आदी मराठी चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका केल्या. तर त्यांच्या ‘थँक यू विठ्ठला’ या आगामी चित्रपटात त्यांनी चित्रगुप्त यांची भूमिका वठवली आहे. ‘बापजन्म,’ ‘न्यायाम’ ‘वर्तुळ,’ ‘ऑपरेशन मीरा’ हे त्यांचे काही आणखी आगामी चित्रपट. याशिवाय सुनील गोडबोले यांनी ‘ड्रीम्स,’ ‘शिखर,’ ‘अहिस्ता अहिस्ता,’ ‘चल चला चला,’ ‘चिंगारी’ आदी हिंदी चित्रपटांतही कामे केली आहेत. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची साईबाबांची भूमिका असलेल्या ‘मालिक एक ’ या चित्रपटातही त्यांची लक्षणीय भूमिका आहे. सुनील गोडबोले यांची चेहरेपट्टी विनोदी स्वभावाची असली तरी ते वेगवेगळ्या भूमिका करायला नेहमीच प्राधान्य देतात. आणि आतापर्यंत त्यांना तशा विविध प्रकारच्या भूमिका मिळतही गेल्या आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये नामवंत अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अभिनयाच्या दृष्टीने नेहमी फायदाच झाला, या शब्दांत ते कृतज्ञता व्यक्त करतात.
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपली अभिनयकला सादर करणारे सुनील गोडबोले हे गेली 45 वर्षे अभिनयाचा प्रवास करीत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले, मात्र हे अनुभव त्यांना समृद्ध करून गेले. वरील तिन्ही माध्यमांपैकी नाटक हे त्यांच्या सर्वात आवडीचे, जणू जीव की प्राण. कारण नाटक हे लाइव्ह असल्यामुळे तेथे चुकीला माफी नसते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. शिवाय या नाटकामुळे त्यांना सहधर्मचारिणी मिळाली आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सरिता गोडबोले यांनीही पूर्वी नाटकांमध्ये कामे केली आहेत. आणि हलाखीच्या परिस्थितीत घर सांभाळून सुनील गोडबोले यांच्या अभिनय प्रवासात त्यांना मोलाची साथ केली आहे. सुनील गोडबोले यांना आतापर्यंत ‘बालगंधर्व पुरस्कारा’सह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र रंगभूमीवर असताना मिळणारा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद हाच ते सर्वोच्च पुरस्कार मानतात. त्यांच्या पुढील अभिनयकलेच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा.