ग्रंथाविश्व | अस्मिता प्रदीप येंडे
आपण आजवर अनेक कवी, लेखक यांचं साहित्य वाचलं असेल, त्यांच्या साहित्यावर अनेक कार्यक्रम सादर केले जातात, चर्चासत्र होतात, त्यांच्या कविता, कथा रसिकांच्या मनात अजरामर होतात. अनेक राजकारणी व्यक्ती, कलाकार यांचं कार्य आपणास माहीत आहे. पण या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नीची भूमिका काय असेल किंवा या विविध व्यक्तिमत्त्वांच्या पत्नीची फक्त नावेसुद्धा आपल्याला पटकन सांगता येत नाहीत, ही खरेच खेदजनक गोष्ट आहे.
घरातील पुरुष आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी बेदरकारपणे तेव्हाच बाहेर पडू शकतो जेव्हा घरातील स्त्री सक्षमपणे कुटुंबाची धुरा सांभाळते. तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्यामुळे जिच्या त्यागाची, प्रेमाची प्रतिमा झाकोळली गेली अशा अर्धांगिनीची जीवनगाथा पुस्तकरूपात यावी, या प्रांजळ व कृतज्ञ भावनेने लेखिका यामिनी पानगांवकर यांनी ‘साहित्यिकांच्या अर्धांगिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात साहित्यिक, राजकारणी व्यक्ती, कलावंत अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या सहचारिणींचा परिचय करून दिला आहे. एकप्रकारे ही साहित्यिकांच्या पत्नींची अल्प चरित्रे आहेत. या पुस्तकात स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य देऊन तिचं कार्य प्रकाशात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लेखिकेने केले आहे. ‘साहित्यिकांच्या अर्धांगिनी’ पुस्तकाचे शीर्षक इतके समर्पक आहे, की वाचताच क्षणी हा विषय मनात रुंजी घालत राहतो. खरेच विचारप्रवृत्त करणारी गोष्ट आहे ही, ज्यांचे कार्य जगाला माहीत आहे, त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांच्या अर्धांगिनीचे किती बहुमोल योगदान असेल, हा विचार कधी मनात डोकावला नाही.
लेखिका यामिनी पानगांवकर यांनी या पुस्तकात 24 अपरिचित स्त्रियांचा परिचय, त्यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. सहज ओघवती भाषाशैली, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे या पुस्तकाची साहित्यिक गुणवत्ता लक्षात येते. लेख वाचण्यापूर्वी लक्ष वेधून घेतात ते लेखांचे मनोवेधक, यथार्थ शीर्षके. शीर्षक वाचल्याशिवाय लेखांकडे वळता येतच नाही. प्रत्येक लेखाखाली दिलेल्या संदर्भग्रंथांच्या उल्लेखांमुळे संबंधित लेखिकेबद्दल आणखी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. पुस्तकात रामकृष्ण परमहंस, जवाहरलाल नेहरू, गोपाळ आगरकर, माधव ज्युलियन, बालकवी, महर्षी धोंडो केशव कर्वे, कवी अनिल, वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे, डॉ. श्रीधर केतकर, डॉ. चिंतामणराव देशमुख, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, व. पु. काळे, गदिमा, जयवंत दळवी, प्रभाकर पाध्ये, वसंत कनेटकर, विंदा करंदीकर, श्री. ज. जोशी, विद्याधर पुंडलिक, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या पत्नींचा जीवनप्रवास यात शब्दबद्घ केला आहे. पुस्तकात स्त्रियांच्या एकूणच जीवनप्रवासासोबतच तत्कालीन सामाजिक परंपरा, रूढी, सामाजिक भेद, तत्कालीन विचारसरणी, कौटुंबिक वातावरण, स्त्रियांचे जीवन, भावविश्व, त्यांच्या वेदना हा भागही अत्यंत प्रभावीपणे लेखिकेने नमूद केला आहे. प्रचंड वाचन, दुर्मीळ ग्रंथ मिळवून, संबंधित साहित्यिकांच्या नातेवाइकांना भेटून, चर्चा करून, प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून लेखिकेने हा महत्त्वपूर्ण ऐवज वाचकांसाठी प्रकाशात आणला आहे. यातील काही स्त्रियांबद्दल फारच जुजबी माहिती आपण ऐकली असेल, पण या पुस्तकात या सहचारिणींच्या जीवनाचं वास्तव, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग, वेदना, दुःख वाचताना जाणवते की, अरे आपण किती अनभिज्ञ होतो या गोष्टींपासून.
या पुस्तकात ज्या 24 स्त्रियांचा परिचय करून दिला आहे, त्यातील 12 जणींची आत्मकथने प्रसिद्ध आहेत. ज्या स्त्रियांनी संसारासोबतच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, संघर्ष केला, सामाजिक भान जपत जबाबदार्याही पेलल्या. ज्या प्रखर, तेजस्वी सूर्याच्या सोनेरी कडा होऊन त्या व्यक्तिमत्त्वांना आकार दिला, त्या कणखर आणि तितक्याच संवेदनशील अर्धांगिनींना वाहिलेली ही खरी आदरांजली आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदादेवी यांनी केलेले आध्यात्मिक कार्य, गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी यशोदाबाई आगरकर यांनी केलेले समाजकार्य, त्या काळात महर्षी धोंडो केशव कर्वे आणि आनंदीबाई कर्वे यांचा तसेच सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख यांचे झालेले पुनर्विवाह, त्यांच्या जीवनातील वैयक्तिक हळवे क्षण, संकटांची मालिका ह्या सर्व गोष्टी या पुस्तकामुळेच माहीत होतात.
आपल्या संस्कृतीत पत्नीला सहचारिणी, अर्धांगिनी संबोधले जाते. त्या अर्थांप्रमाणे स्त्री पतीचे अर्धे अंग बनून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपण निरंजन लावतो, पाहताना लोक म्हणतात की दिवा जळतो आहे. खरे तसे नसते. दिवा जळत नसतो तर दिव्यातील वात जळत असते. तो दिवा म्हणजे पती आणि त्यातील वात म्हणजे पत्नी, अर्धागिनी. हा दृष्टिकोन निर्माण करणारे हे पुस्तक स्त्रित्वाची खरी जीवनगाथा आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश खानविलकर यांनी समर्पक साकारले आहे. तसेच लेखक, कवी रामदास खरे यांनी मौलिक अभिप्राय दिला आहे.
या पुस्तकाचे संदर्भमूल्य लक्षात घेता मराठी साहित्यात विशेष रुची असणार्या, संबंधित विषय हाताळणार्या संशोधक, अभ्यासकांना ‘साहित्यिकांच्या अर्धांगिनी’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
साहित्यिकांच्या अर्धांगिनी
लेखसंग्रह
यामिनी पानगांवकर
संधिकाल प्रकाशन
मूल्य – 175 रुपये