ग्रंथविश्व | अस्मिता प्रदीप यंडे
बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था ह्या मानवी जीवनातल्या अवस्था आहेत. माणसाचे आयुष्य हे चढउतारांनी भरलेले असते. जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. प्रत्येकाच्या संघर्षाचे स्वरूप वेगवेगळे असते. आयुष्य म्हणजे सुखदुःखाची मालिका असते. एकामागून एक येत राहते. सतत सुखाचा वर्षाव होईल असे नाही, दुःखाची सोबतही असते. काही जण दुःख उराशी कवटाळून बसतात तर काही जण दुःखातून बाहेर पडून जगण्याला महत्त्व देतात.शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. संकट, दुःख, वेदना कोणाला नाहीत? सगळ्यांना आहेतच या ना त्या स्वरूपात.. दुःख-सुख गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही. पण या संकटांशी दोन हात करून लढणारी व्यक्ती धीटपणे जीवन व्यतित करते. आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला येतं, पण ते तुम्ही कसे जगता, यावर तुमचं सुख – समाधान अवलंबून असते. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर आयुष्य हे जीवनगाणे बनून जाते.
स्मरणशक्ती म्हणजे मानवाला मिळालेले वरदानच आहे. जे जे क्षण आपण वर्तमानात जगतो त्याच क्षणांच्या आठवणी निर्माण होतात. अनेक सुख-दुःखाचे क्षण माणूस आपल्या मनात साठवून ठेवतो आणि त्या पुनःपुन्हा स्मरत राहतो. काही वेळा असेही होते, जे विसरायचे असते तेच नेमके आठवणीत राहते आणि जे आठवणीत राहावे असे वाटते तेच नेमके विसरले जाते. पण पाटीवरील अक्षरे जशी सहज पुसता येतात तशा आठवणी सहज पुसता येत नाहीत, नाही का!?
अशाच काही आठवणींचा लेखाजोखा पुस्तकरूपात मांडता आला तर… किती छान कल्पना आहे ना! लेखिका वर्षा महाजन लिखित ‘मर्मबंधातली ठेव’ हे पुस्तक म्हणजे आयुष्याची स्मरणिका आहे. या पुस्तकाचे शब्दांकन लेखिका संपदा वागळे यांनी सुंदररीत्या केले आहे. लेखिका वर्षा महाजन या निवृत्त प्राध्यापिका असून, वयाच्या या ठरावीक टप्प्यावर येऊन त्यांनी ही आठवणींची पोतडी पुस्तकरूपात वाचकांसाठी खुली केली आहे. खरेच आयुष्य कसे जगावे, कसे सार्थकी लावावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकात लेखिकेचा एकूण जीवनप्रवास मांडलेला आहे. बालपण, आई-बाबा, शिक्षण, नोकरी, लग्न, आईपण आणि शिक्षिका म्हणून केलेले कार्य याचा संपूर्ण लेखाजोखा यात वाचायला मिळतो. पुस्तकातील विविध प्रकरणं, त्यासोबत छायाचित्रे, पुस्तकाची प्रथमपुरुषी निवेदनशैली, ओघवती आणि साधी – सोपी भाषाशैली आणि कुठेही बडेजावपणाचा लवलेश न दाखवता सर्व आठवणी सहजतेने मांडल्या आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना प्रत्येकाला या पुस्तकात आपल्या जीवनाचे प्रतिबिंब दिसायला लागते. वर्षा महाजन यांनी 36 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यादरम्यान विद्यार्थ्यांशी जुळलेले ऋणानुबंध, शिक्षक म्हणून असणारी तळमळ, आपल्या कामात स्वतःला झोकून देण्याची वृत्ती, मेहनती, जिद्दी, धाडसीपणा आणि ध्येयवादी जीवन जगणार्या महाजन यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. मुलांशी असलेले त्यांचं नातं पुस्तक वाचताना जाणवते. शिकवता शिकवता लेखिका सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाई कधी झाल्या, हे कळतच नाही. पुस्तक सुरू होतं ते बालपणाच्या प्रवासापासून. आईवडिलांच्या संस्कारात लहानाची मोठी झालेली लेखिका, घरातील वातावरण, मित्र-मैत्रिणी, शाळा या आठवणी आजही ताज्या वाटतात. ह्या आठवणी लिहिताना लेखिका भूतकाळात नक्की विसावल्या असतील. महाविद्यालयातील त्यांचं जीवन, या प्रवासात एस. वाय. गोडबोले सरांचे मिळालेले मार्गदर्शन तसेच गिरगावातील त्यांचं वास्तव्य, के. ना. चाळीतील गणपती उत्सव, तेथील आपलेपणा, संघटित वृत्ती आणि जोडलेली माणसे हीच त्यांची खरी संपत्ती!
प्रकरण जसेजसे पुढे जात राहते तशी वाचण्याची ओढ वाढत राहते. पुढे पती विजय महाजन यांच्यासोबत बांधलेली लग्नगाठ आणि त्यांचा संसार, संसार करताना आलेल्या अडचणी, मतभेद किंवा तडजोड याबाबत अगदी बारकाईने आठवणी लिहिल्या आहेत.जोडीदारासोबतचा प्रवास, उडालेले खटके आणि नात्यातील प्रेम हे सगळे सांभाळताना एक पत्नी म्हणून, सून म्हणून असलेली सर्व कर्तव्ये त्यांनी पार पाडली. कधीच प्रश्न निर्माण केले नाहीत, तर त्यावर उत्तर शोधले. घर, संसार आणि त्यात मुलांचा जन्म ह्या सुखावणार्या घटना. आई म्हणून त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले, व्यक्ती म्हणून घडवले. यासोबतच लेखिका आणि त्यांच्या सासूबाई यांच्यातील स्नेह कसा वाढत जातो, हेही विशद केले आहे. घर आणि मुलांना सांभाळताना त्यांनी अध्यापनही केले. घरातील कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी स्वतःचं अस्तित्व जपण्यास सुरुवात केली. अध्यापन करणे हे त्यांच्या आवडीचे काम. त्यामुळे त्या मुलांना शिकवण्यात रमून जात असत. ‘अध्यापनातील सोनेरी दिवस’ हे प्रकरण खरेच स्मरणीय झाले आहे. शिक्षक हे देशाचे नागरिक घडवत असतात, पुढील पिढी निर्माण करत असतात, त्या पिढीवर चांगले संस्कार करण्याची आणि विद्यादान करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. या प्रकरणातून त्यांच्यातील हाडाच्या शिक्षिकेचे दर्शन घडते. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.
लेखिकेची कन्या प्रज्ञा आणि मुलगा सुबोध यांची आई म्हणून त्यांचे असणारे प्रेम, जिव्हाळा, मुलांचं बालपणसुद्धा यात अनुभवायला मिळते. पती विजय महाजन यांची या प्रवासात उत्तम साथ आणि पाठिंबा मिळाल्याचे पुस्तकात पदोपदी जाणवते. या पुस्तकासाठी बारीकसारीक आठवणी लिहिताना तारखेसकट सूक्ष्म नोंदी लिहिण्यासाठी विजय महाजन यांची मोलाची मदत झाल्याचेही त्या आवर्जून सांगतात. ‘चिंतामणी पर्व’ या प्रकरणातून घरासंबंधी असलेला विशेष स्नेह मनाला भावतो. घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात. घरातल्या माणसांनी, त्यांच्या वास्तव्याने, स्नेहबंधाने घराला घरपण येतं ही भावना यातून व्यक्त होताना दिसते. तसेच ‘प्राचीमधला लळा जिव्हाळा’ या प्रकरणातील प्राची म्हणजे मुलुंडमध्ये जेव्हा महाजन कुटुंबीय वास्तव्यास होते त्या इमारतीचे नाव. या प्राचीमध्ये राहत असताना जोडलेली माणसे, जपलेला शेजारधर्म, एकत्रितपणे साजरे केलेले सण-उत्सव या आठवणी सदर प्रकरणात मांडलेल्या आहेत. एक आदर्श शिक्षिका, एक उत्तम पत्नी, आदर्श गृहिणी, सून, आई आणि आता आजी अशा सर्व भूमिका लेखिका उत्तमरीत्या निभावत आहेत. आपल्या शिक्षणाचा त्यांनी योग्यरीत्या सदुपयोग केला आणि जीवन समृद्ध केलं. या प्रवासात ज्यांची ज्यांची साथ मिळाली, त्यांचा नामोल्लेख करायला त्या विसरल्या नाहीत.
‘माणिक बाग’ ह्या प्रकरणातून महाजन यांची निसर्गात रमण्याची वृत्ती तसेच बागकामाची असलेली आवड, शेतीची आवड दिसून येते. ही काही एकरांची जमीन माणिक बाग होतानाचा प्रवास विलक्षण आहे. याच माणिक बागेच्या घरात शेरा आणि जिमी या श्वानांशी जुळलेले नाते, माया, या श्वानांनी लेखिकेला लावलेला लळा हा भाग वाचताना मन अधिक हळवं होतं. त्यांनी केलेल्या जगभ्रमंतीचं वर्णनही यात समाविष्ट आहे.एकट्याने वा कधी कोणाच्या सोबतीने लेखिकेने पर्यटन केलेले आहे. भटकंतीची आवड असणार्या लेखिका ‘माझं पर्यटन – भाग 1 आणि 2 ’ या प्रकरणात युरोप सहल, अंदमान, केरळ – कन्याकुमारी, काश्मीर ट्रिप अशा विविध ठिकाणी भेटी देऊन पर्यटनाचा आनंद त्यांनी लुटला. या प्रकरणात लेखिका स्वतः पर्यटन मार्गदर्शकाच्या भूमिकेतून वाचकांनाही ही सफर घडवत आहेत. सुप्रा केमिकल्स या स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात, लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि उत्पादन वाढवून व्यवसाय पुढे नेण्यासाठी मुलाची मिळालेली साथ यामुळे त्यांचा व्यवसाय कसा फुलत गेला, हे वाचण्यासारखे आहे. पती, मुलगा, मुलगी, सुनबाई, जावई, नातू – नाती , नातेवाईक, मैत्रिणी या सगळ्यांप्रति असलेले प्रेम आणि जबाबदारी त्या तितक्याच आपुलकीने सांभाळतात. माणसे जोडणं आणि नाती जपणं या त्यांच्या तत्त्वामुळे आणि समजुतीच्या स्वभावामुळे त्यांच्या आजूबाजूला इतका गोतावळा आहे.
आयुष्यातील सर्व जबाबदार्या पार पाडल्यानंतर लेखिका आपले छंद जोपासताना दिसतात. निवृत्तीनंतरचे जीवन कसे जगावे आणि मिळालेल्या आयुष्याचे सोने कसे करायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. उदवैली बुक्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित केलेले असून पुस्तकाचा आकृतिबंध, पुस्तक बांधणी उत्तम आहे. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी ही ‘मर्मबंधातली ठेव’ वाचनीय आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे.
अस्मिता येंडे
(मर्मबंधातली ठेव / लेखिका वर्षा महाजन /शब्दांकन : संपदा वागळे / प्रकाशक : उदवैली बुक्स / मूल्य : 400 रुपये )