दिनमान प्रतिनिधी
दापोली|
दापोली तालुक्यात वाकवली येथील शेतकरी राजाराम शिगवण यांच्या शेतातील पाण्याच्या टाकीत दुर्मीळ पाणमांजर मिळाले असून त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीत प्राणी असल्याचे शिगवण यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन्यजीवरक्षक तुषार महाडिक आणि मिलिंद गोरीवले यांच्याशी संपर्क केला.
घटनास्थळी हे दोघे पोहोचल्यावर त्यांना या टाकीत हे दुर्मीळ पाणमांजर दिसले. याला इंग्रजीत बेबी स्मूथ कोटेड ऑटर असे नाव आहे. या घटनेची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, वनरक्षक वैभव बोराटे, दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्र. ग. पाटील यांना दिली.
वनसंरक्षक गणपत जळणे, प्राणिमित्र किरण करमरकर यांनी घटनास्थळी येऊन पाणमांजर सुरक्षित असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. असा कोणताही जखमी वन्यजीव आढळल्यास वन विभाग दापोली अणि वन्यजीवरक्षक यांच्याजवळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.