दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई।
काही दिवसांपूर्वी नवी मुंबई एपीएमसीच्या मसाला बाजारात घसरलेले मिरचीचे दर पुन्हा कडाडले आहेत. उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यात प्राधान्याने वर्षभर पुरेल इतक्या लाल मसाल्याची बेगमी करण्यासाठी मसाल्याच्या मिरच्यांना मागणी वाढली आहे. मात्र यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यासाठी लागणार्या लाल मिरच्या कमी प्रमाणात दिसत आहेत. परंतु दुसरीकडे या मिरच्यांची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. मसाल्याचा रंग खुलवणारी काश्मिरी मिरची आणि मसाल्याची चव वाढवणारी शंकेश्वरी मिरची तर बाजारात अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाचा दाह वाढू लागल्यानंतर वाशीतील घाऊक मसाला बाजारात मिरची व मसाल्याच्या पदार्थांची आवक वाढू लागते. एकेकाळी या हंगामात बाजारात मिरच्यांचा 80 ते 100 गाड्यांची आवक दिवसाला होत होती. मात्र आता परिस्थिती बदलली. ऑनलाइनच्या जमान्यात ही आवक कमी कमी होत गेली. थेट पणनाचा कायदा आल्यानंतर बाजार खुले झाल्याने तर ही आवक दिवसाला अवघ्या 30 ते 40 गाड्यांवर आली. त्यातच या वर्षी मसाल्यासाठी लागणार्या मिरचीचे उत्पादन कमी असल्याने, बाजारात मिरची कमी प्रमाणात येत आहे. सध्या घाऊक बाजारात दिवसाला अवघ्या आठ ते 10 गाड्या मिरची बाजारात येत असल्याचे घाऊक व्यापारी सांगतात.
संपूर्ण हंगामात बाजारात मसाल्याच्या सात ते आठ लाख पोती मिरच्या बाजारात येतात. एका पोत्यात 40 ते 50 किलो मिरच्या असतात. मसाल्यासाठी मुख्यतः बेडगी, तेजा, शंकेश्वरी, काश्मिरी या मिरच्या लागतात. त्यांच्याबरोबर अख्खा गरम मसालाही लागतो. या अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत.
मिरचीची आवक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणात होते. रेशमपट्टी या कमी तिखट मिरचीला गुजरात्यांकडून मोठी मागणी असते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने, बाजारातच कमी प्रमाणात मिरच्या उपलब्ध आहेत. परिणामी सर्वच जातीच्या मिरच्यांचे दर 30 ते 40 टक्यांनी वाढलेले दिसत आहेत.
मिरचीचे दर (किलोमागे)
गेल्या वर्षी आता
लवंगी 200 ते 230 रु. 400 ते 450 रु.
बेडगी 330 ते 350 रु. 500 ते 600 रु.
पांडी मिरची 220 रु. 300 ते 350 रु.
काश्मिरी मिरची 450 रु. 600 ते 650 रु.
शंकेश्वरी 480 रु. 1000 ते 1200 रु.
संक्रांतीनंतर बाजारात मिरच्यांची आवक सुरू होते. मात्र यावर्षी संक्रांतीनंतर फार कमी प्रमाणात माल बाजारात आला आहे. त्यात शंकेश्वरी मिरची तर खूपच कमी उपलब्ध आहे. त्यामुळे तिचे दर सर्वाधिक वाढले आहेत. मिरचीचा साठाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करणे कठीण जात आहे.
– अमरीश बारोट, मिरची घाऊक व्यापारी