दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली|
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग – २०२३ उत्सवाला डोंबिवलीकरांसह गरबा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच जल्लोष व उत्साह आहे. अलोट गर्दीच्या जल्लोषाने रासरंगच्या चौथ्या दिवसाची सांगता झाली. गरबा नृत्याचा अनुभव घेण्यासाठी विशेष मुलांनीही उपस्थिती लावली. या वेळी कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दांडिया रासरंगमध्ये नैतिक नागदा आणि त्यांचे सहकलाकार उत्कृष्ट सादरीकरण करत आहे.
रासरंग – २०२३ ला लाभली विशेष उपस्थिती या उत्सवाला तरुण मित्र मंडळींसह, ज्येष्ठ नागरिकांनी नैतिक नागदा यांच्या स्वरांवर आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी सादर केलेल्या वाद्यवृदांच्या तालावर गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी डोंबिवली येथील संतोष इन्स्टिट्यूट स्वमग्न मुलांची शाळा येथून आलेल्या काही विशेष मुलांनीही गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी या सार्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत सुरात सूर मिसळला, आणि रासरंग कार्यक्रमाला विशेष रंग लाभला. विशेष मुलांनी या रासरंगाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुलांशी संवाद साधला.
सन्मान स्त्रीशक्तीचा
रासरंग उत्सवात पुरस्कारांची परंपरा पुढे नेत विविध महिलांचा सन्मान करण्यात आला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्ज्वल करणारी बॉक्सिंग चॅम्पियन ईशा भगत या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. दुसर्या दिवशी डोंबिवली शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर आणि गेल्या पंधरा वर्षांपासून शिक्षणसेवेत कार्यरत असलेल्या उन्नती पतंगराव यांना तर तिसर्या दिवशी यशस्वी उद्योजिका विदुला आमडेकर आणि भारती पालकर यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर चौथ्या दिवशी कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात संगीत क्षेत्रात आपल्या गायनाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या मृदुला दाढे जोशी आणि कथ्थक नृत्यविशारद ज्योती शिधये यांना नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला.