दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई|
स्वतःच्या जमिनीचा व्यवहार दोन कंपन्यांसोबत केला असताना त्याच जमिनीचा व्यवहार सिडकोशी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पनवेल जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
शिरीष घरत यांची २५ गुंठे जमीन (जुना सर्व्हे नं. ४७४, गट नं. १७) मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोने घेतली. त्या बदल्यात अन्यत्र तेवढीच जमीन देण्याचे करारपत्रही सर्व कायद्याचे सोपस्कार पूर्ण करून करण्यात आले. असे असताना हीच जमीन करारापूर्वी मे. के. एस. श्रीया इन्फाबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. यांना साठेखत व कुलमुखत्यारपत्राद्वारे रक्कम ७० कोटी रुपयांना विक्री करण्यात आली होती. या व्यवहारपोटी घरत यांनी १ कोटी ९८ लाख रक्कम स्वीकारली होती. तसेच सदर भूखंड संबंधितासअभिहस्तांतरित करून त्यामध्ये नमूद दोन कंपन्यांचा त्रयस्थ पक्षकाराचा अधिकार प्रस्थापित केला. शिरीष घरत यांचे नमूद भूखंडाबाबत अधिकार संपुष्ठात आले होते. तरीही तो स्वत:च्या अधिकारात असल्याचे खरेदीदार वर नमूद दोन कंपन्या व सिडको महामंडळास भासवून अप्रामाणिकपणे सदर भूखंडाची ताबा पावती सिडको महामंडळाला दिली. त्या मोबदल्यात स्वतःचे फायद्याकरिता समान क्षेत्राचा भूखंड क्र. १९/ ए, सेक्टर ०७, खारघर नोड, क्षेत्र २५०० चौ. मि. याचा ताबा घेऊन मे. के. एस. श्रीया इन्फाबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. यांची व सिडको महामंडळाची ६० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले.