दिनमान प्रतिनिधी
विरार।
वसई-विरार मनपाच्या ई प्रभागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय शौचालयाच्या बाजूला दुर्गंधी सोबत केली असून प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना बसण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने पालिकेचे कार्यालय करदात्या नागरिकांसाठी आहे की कर्मचार्यांसाठी असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
पालिकेचे प्रभाग हे लोकांसाठी आहेत. त्याद्वारे करदाते नागरिक हे केंद्रस्थानी असणे आवश्यक आहेत. मात्र या प्रभागात आलेल्या नागरिकांनाच दुय्यम वागणूक दिली जाते. प्रशासकीय सेवा हा नंतर येणारा प्रश्न आहे. या कार्यालयात प्राथमिक सुविधांची वानवा आहे.
अतिक्रमण विभागात येथील ठेका कर्मचारी चिन्मय वर्तक व इतर कर्मचारी अभ्यगतांच्याच खुर्चीवर ठाण मांडून मोबाइलवर खेळत बसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना येथून पिटाळण्यातच कर्मचारी धन्यता मानत आहेत.
करदात्या नागरिकांनी आपल्या समस्या काही माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितल्यावर याबाबत वस्तुस्थितीची पाहणी केली असता त्यात तथ्य असल्याचे आढळून आले.
प्रशासकीय सेवा, शिस्त आचासंहिता याद्वारे मिळणे क्रमप्राप्त असताना आयुक्त अनिलकुमार पवार यांनी याबाबत मार्गदर्शन केले असतानाही याबाबतचे निर्देश ई प्रभाग समितीने बासनात गुंडाळलेले आहेत.
याबाबत ई प्रभागाचे प्रभारी सहायक आयुक्त मनोज वनमाळी यांना विचारणा केली असता या इमारतीचे नूतनीकरण होणार आहे त्यात फेरबदल केले जातील. त्यावेळी या ग़ैरसोयी टाळल्या जातील. तसेच अतिक्रमण कर्मचार्यांना दालनात न बसता पालिका हद्दित मार्केट व अन्यत्र लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत तरी त्याची अंमल बजावणी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.