दिनमान विशेष प्रतिनिधी
ठाणे।
अॅड. आदेश भगत यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे दिवा येथे भाजपाला झटका बसला आहे. दिवा मंडळ अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हातात घेतला.
दिवा भागात आदेश भगत यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्वसामान्यांचा सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षे काम करणार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपाचे दिव्यात बस्तान बसविण्यासाठी आणि मोठी संघटनात्मक फळी उभी करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दिवा भाजपाच्या अंतर्गत कुरघोडीला कंटाळून त्यांनी अखेर त्यांच्या पत्नी अॅड. सुप्रिया भगत व माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांच्यासह शेकडो समर्थकांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबंधन बांधल्याने दिवा येथे सेनेला आणखी बळ मिळाले आहे. यावेळी ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर नरेश म्हस्के, सभागृह नेते अशोक वैत्ती, स्थायी समिती सभापती संजय भोईर उपस्थित होते.