दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
वीजचोरी शोधमोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर बुधवारी हल्ला झालेल्या खोणी गावात महावितरणने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी धडक कारवाई केली. या मोहिमेत ५५ ठिकाणी वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर, १९ ठिकाणी संशयास्पद मीटर आढळून आले आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हल्ल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
डोंबिवली नजिकच्या खोणीगाव (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे बुधवारी दुपारी महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला केला होता. यात बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस कर्मचारी जखमी तर महावितरणचे कर्मचारी-अधिकार्यांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यात आली होती. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या सक्रिय सहकार्याने गुरुवारी खोणी गावात धडक वीजचोरी शोध मोहीम राबवण्यात आली. महावितरणचे ११३ कर्मचारी, ३२ अभियंते, १५ सुरक्षारक्षक, १८ महिला कर्मचारी आणि बंदोबस्तासाठीचे ३० पोलिस कर्मचारी यांच्या २१ पथकांनी खोणी गावातील २५४ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. या तपासणीत ५५ जणांकडे थेट वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर तर १९ ग्राहकांकडील वीजमीटर संशयास्पद आढळले.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून मीटर काढलेले असताना थेट वीजचोरी, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणार्या केबलला जॉईंट करून वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी, असे प्रकार तपासणीत आढळून आले आहेत. भ्याड हल्ल्यानंतर न डगमगता वीज चोरांविरुद्ध जोमाने कारवाई सुरू राहणार असल्याचा संदेश गुरुवारच्या धडक कारवाईतून देण्यात आला.