दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
यंदाच्या पावसाळ्या ठाण्याच्या खाडीला ५२ दिवस मोठी भरती येणार असून याकाळात ४ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात यंत्रणा सतर्क ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. ठाणे शहराला ३२ किमी लांबीचा खाडी किनारा लाभला आहे. खाडी भरतीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्यास शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचते. खाडी किनारी भागातील घरांमध्ये पाणी शिरून जनव्यवहार विस्कळीत होतात. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर खाडी भरतीच्या वेळेस अतिवृष्टी होणार असेल तर पालिका नागरिकांना इतरत्र स्थालंतरीत होण्याची सुचना देते. याशिवाय, पावसाळ्याच्या कालावधीत खाडीला येणार्या मोठ्या भरतीची माहिती पालिकेकडून दरवर्षी जाहिर करण्यात येते. अशाचप्रकारे यंदाही पालिकेने अशी माहिती जाहिर केली आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यातील मोठ्या भरतीचे दिवस जाहीर करण्यात येतात. यंदा जून ते सप्टेंबर या काळात सुमारे ५२ दिवस मोठी भरती येणार आहे. जून महिन्यात १३ दिवस, जुलै महिन्यात १४ दिवस, ऑगस्ट महिन्यात १४ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात ११ दिवस असे एकूण ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने भरतीचे हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या काळात चार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. यापैकी सर्वाधिक उंच लाटा ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ उसळणार असून या लाटांची उंची ४.६० मीटर इतकी असणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपूरे यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यातील मोठ्या भरतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.