दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
गणपती बाप्पा आल्यावर पाठोपाठ गौराईंचे आगमन होते. यंदा ओवशाचा मुहूर्त असल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर सुपांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सुपांच्या किमतीतही ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका सुपाचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. यंदा विदर्भ-मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने बांबूच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. दरवर्षी ठाण्यात जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, गडचिरोली येथून कारागीर येतात आणि ते दिवसरात्र सुपे बनवण्याच्या कामात व्यस्त असतात.
गणेश चतुर्थीनंतर तिसर्या-चौथ्या दिवशी माहेरवाशीण गौराईंची स्थापना केली जाते. वाजत गाजत गौराईंना घरी आणले जाते. गौराईंना साडी नेसवली जाते, नटवले जाते. गौराईंची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातूनच केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते, तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मीची पूजा केली जाते. कोकणातील काही भागांत गौरीपूजनामध्ये ओवसा ही एक परंपरा प्रचलित आहे.
ओवसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे
रायगड जिल्ह्यात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौराई पूर्व नक्षत्रात येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौराईंसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौराई पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत गौराईंना ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत रूढ आहे. यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.