दिनमान प्रतिनिधी
विरार|
नायगाव पूर्वेतील वाकीपाडा येथील एका स्थानिक शेतकर्याची व त्याच्या कुटुंबीयांची एकूण २५ एकर शेती औद्योगिक कंपन्या व रहिवासी इमारतीतील सांडपाण्यामुळे नापीक झाली आहे. या शेतकर्यांनी याविरोधात स्थानिक महसूल विभाग व महापालिका प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र महसूल विभागाकडून या तक्रारींकडे काणाडोळा केला जात आहे.
वाकीपाडा येथील रहिवासी हेमराज पांडुरंग भोईर यांची व त्यांच्या कुटुंबीयांची रामदेव ब्लॉक कंपनी ते वासमार्या खाडीपर्यंत सुमारे २५ एकर शेती आहे. या शेतीभोवती एकूण २५ हून अधिक औद्योगिक कंपन्या आहेत. तसेच काही रहिवासी संकुले उभी आहेत. या औद्योगिक कारखाने व रहिवासी संकुलातील सांडपाणी हेमराज भोईर यांच्या शेतात सोडल्यामुळे जमिनीचा दर्जा खालावला असून त्याचा फटका हेमराज भोईर व त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. याबाबत हेमराज भोईर यांनी महसूल विभाग यांच्याकडे तक्रार करूनही काहीच दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.