दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंबरनाथ नगर परिषदेच्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास (सेमी इंग्रजी) परवानगी देण्यात यावी, अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दिला आहे. यामुळे या प्रस्तावावरील कार्यवाहीला वेग मिळाला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीच्या एकूण 18 प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या 1,545 इतकी आहे. सद्यस्थितीत अंबरनाथ शहरात सरकारी मालकीच्या शाळांत अद्याप इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शाळांकडे आहे.
नगर परिषदेच्या शाळांत सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची आवश्यकता आहे. याकरिता अंबरनाथ नगर परिषद शाळा क्र. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16,17, 19 या 16 शाळांमध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून सुरू करायचे आहेत. याबाबतचा ठराव नगर परिषदेने शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचे आ. डॉ. किणीकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
नगर परिषद शाळांत सेमी इंग्रजी शिकविण्यास सुरुवात झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक वातावरणामध्ये तग धरण्यासाठी मदत होईल.
– डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ